neet student suicide case : देशात सध्या 'नीट' (NEET) परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर लीक प्रकरणावरून मोठा गदारोळ सुरू असतानाच, नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. नीट परीक्षा दिल्यानंतर ती रद्द झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून नागपूरमध्ये एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, परीक्षेच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर किती गंभीर परिणाम होत आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ऑफिसमध्येच मर्डर, सहकाऱ्याने क्रूरपणे संपवलं; निष्पाप तरुणीसोबत काय घडलं?
NEET च्या तयारीसाठी नागपुरात आली
आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आकांक्षा उर्फ स्नेहा चतुर्वेदी असे असून, ती मूळची मध्य प्रदेशातील मऊगंज येथील रहिवासी होती. आकांक्षा गेल्या काही वर्षांपासून आपल्या आई-वडिलांसोबत आणि भावासोबत नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अजय नगर भागात राहत होती. आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी ती नागपुरात राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होती, मात्र परीक्षेबाबतच्या अनिश्चिततेने तिचे आयुष्यच हिरावून नेले आहे. तिच्या या अचानक जाण्याने चतुर्वेदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा : लग्न ठरलेल्या प्रेयसीला धमकी द्यायला गेला अन् फसला, 24 वर्षीय तरुणासोबत काय झालं?
नीट परीक्षा देण्याची माझी आता हिंमत उरलेली नाही
मृत्यूला कवटाळण्यापूर्वी आकांक्षाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तिची घालमेल स्पष्टपणे दिसून येते. तिने या नोटमध्ये लिहिले आहे की, "मम्मी-पप्पा, पुन्हा नीट परीक्षा देण्याची माझी आता हिंमत उरलेली नाही. मी जी नीटची परीक्षा दिली होती, ती मी अतिशय चांगली दिली होती. पण आता पुन्हा ती परीक्षा द्यायची म्हटली तर, आधीइतकीच चांगली परीक्षा पुन्हा होईल, याची काय गॅरंटी आहे?" या शब्दांत तिने परीक्षेच्या पुनरावृत्तीबाबतची आपली भीती आणि हतबलता व्यक्त केली आहे. तिने आपल्या पालकांची माफी मागत आपण त्यांचे सर्वस्व उध्वस्त केल्याची भावनाही त्यात व्यक्त केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. परीक्षेच्या तणावाखाली असलेल्या अनेक विद्यार्थ्यांपैकी आकांक्षा एक होती, पण व्यवस्थेतील गोंधळामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले, हे अत्यंत वेदनादायी आहे. आकांक्षाच्या या आत्महत्येने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ADVERTISEMENT











