Reel स्टार रोहिणी पाराध्ये जाताच नवऱ्याच्या आयुष्यात नवं वादळ, काय आहे 'ते' प्रकरण?

Reel Star Rohini Paradhye Case: रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्येनंतर पती निलेशच्या मनावर आघात झालाय. दरम्यान, रोहिणीच्या जाण्यानंतर निलेश पाराध्येच्या आयुष्यात मात्र नवं वादळ आलं आहे. जाणून घेऊया याचविषयी सविस्तर.

new storm hits her husband nilesh paradhye life after reel star rohini paradhye departure what exactly is matter

रोहिणी पाराध्ये (फाइल फोटो)

मुंबई तक

01 Jun 2026 (अपडेटेड: 01 Jun 2026, 05:08 PM)

follow google news

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील रील स्टार रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. सोशल मीडियावर आपल्या रील्समधून लाखो लोकांचे मनोरंजन करणारी, कायम हसतमुख दिसणारी रोहिणी अचानक जगाचा निरोप घेऊन गेली आणि तिच्या कुटुंबासह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. मात्र, या सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो तिचा पती निलेश पाराध्ये याला. पत्नीच्या निधनानंतर त्याने सोशल मीडियावर लिहिलेली भावनिक पोस्ट सध्या अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.

हे वाचलं का?

"तू माझं आयुष्य उभं केलंस"

रोहिणीच्या जाण्यानंतर निलेश पराध्येने आपल्या भावना शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. "माझी बायको, माझ्या चिमणे, मला सोडून जायचं नव्हतं ग," अशा शब्दांनी सुरू होणाऱ्या पोस्टमध्ये त्याने पत्नीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

निलेशच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच वर्षांच्या संसारात रोहिणीने त्याला केवळ साथच दिली नाही, तर त्याचं संपूर्ण आयुष्य उभं करण्यासाठी खांद्याला खांदा लावून संघर्ष केला. प्रत्येक अडचणीत ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. जीवनातील संकटांच्या काळात तिनेच त्याला आधार दिला आणि प्रत्येक वादळातून बाहेर काढलं.

पोस्टमध्ये तो म्हणतो की, "जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. आज चांगले दिवस यायला लागले होते, आपल्या स्वप्नांना आकार मिळत होता. पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस."

संघर्षातून उभं राहिलेलं स्वप्न

निलेश आणि रोहिणीची कहाणी ही संघर्षातून उभं राहिलेल्या स्वप्नांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या दाम्पत्याने एकत्र आयुष्याची सुरुवात केली. हातात काहीच नसताना दोघांनी मोठी स्वप्नं पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली.

या मेहनतीतून त्यांनी "हॉटेल ग्रामपंचायत" उभं केलं. ढवरा मटण थाळी ही त्यांच्या हॉटेलची विशेष ओळख बनली. हॉटेलच्या किचनची जबाबदारी रोहिणी स्वतः सांभाळत होती. त्याचबरोबर दोघे मिळून सोशल मीडियासाठी रील्सही तयार करत होते.

त्यांच्या साध्या, ग्रामीण जीवनशैलीवर आधारित रील्स अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग तयार झाला. हॉटेलचा व्यवसायही वाढू लागला आणि दोघांच्या मेहनतीला यश मिळताना दिसत होतं.

26 मेचा काळाकुट्ट दिवस

मात्र 26 मे हा दिवस या कुटुंबासाठी आयुष्यभराची जखम देऊन गेला. दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास रोहिणी पाराध्येने हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने मंगळवेढ्यातील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. सोशल मीडियावरही रोहिणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

आठवणींच्या वादळात हरवलेला निलेश

पत्नीच्या अचानक झालेल्या निधनामुळे निलेश पाराध्ये पूर्णपणे कोसळल्याचं दिसून येत आहे. त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून त्याची मानसिक अवस्था स्पष्टपणे जाणवते.

"आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं. चिमणे, परत ये ग... तुला खूप काही सांगायचं बाकी आहे," अशा शब्दांत त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत.

पोस्टच्या शेवटी तो लिहितो, "तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील."

आत्महत्येमागील कारणांचा शोध

रोहिणी पाराध्येने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून तपासानंतरच आत्महत्येमागील कारण समोर येणार आहे.

मात्र, एक गोष्ट निश्चित आहे, रोहिणीच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर, मित्रांवर आणि विशेषतः पती निलेशवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संघर्षाच्या काळात सोबत राहून आयुष्य उभं करणारी जीवनसाथी अचानक निघून गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढणं सोपं नाही.

रोहिणीच्या आत्महत्येमागचं सत्य भविष्यात समोर येईल. पण तिच्या आठवणींचं वादळ निलेश पाराध्येच्या मनात मात्र दीर्घकाळ घोंगावत राहील, हे निश्चित.