Crime News : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात एका अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेली मैत्रीचे रूपांतर समलैंगिक प्रेमसंबंधात झाले. शेवटी या प्रेम प्रकरणाचा शेवट एका हत्याप्रकरणात झालाय. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
हेही वाचा : भाजपने बसवराज पाटील यांना उमेदवारी, आता काँग्रेसने तरुण तुर्क नेता मैदानात उतरवला
लग्नास नकार दिल्याच्या रागातून केला खून
समलैंगिक प्रेमसंबंध बहरलेले असताना लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका युवकाने आपल्याच मित्रावर चाकूने सपासप वार करून हत्या केली आहे. रविवारी पहाटे देवदा गावाच्या जवळ घडलेल्या या घटनेने माणुसकीला काळीमा फासली असून, स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत आरोपीला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
हेही वाचा : Astrology : गुरूचा कर्क राशीत प्रवेश, हंस महापुरुष राजयोगाची निर्मिती; 'या' राशींचे भाग्य बदलेल
इन्स्टाग्रामवरची मैत्री समलैंगिक संबंधात बदलली
मृतक युवकाची ओळख 32 वर्षीय सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद अशी पटली असून, तो अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील रहिवासी होता आणि तिथे त्याचे गॅरेजचे दुकान होते. तर, अटकेत असलेल्या आरोपीचे नाव सूरज हलदार (वय 30) असून, तो मूळचा ओडिशा राज्यातील नबरंगपुर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ही घटना एटापल्लीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील हालेवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देवदा गावाजवळ घडली आहे. सतीशकुमारचा काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सूरजशी संपर्क आला होता, जो हळूहळू घनिष्ठ मैत्रीत आणि पुढे समलैंगिक संबंधात बदलला होता.
सूरजने सतीशकुमारसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला होता, परंतु सतीशकुमार आधीच विवाहित असल्याने त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला होता. दोन दिवसांपूर्वी सूरज सतीशकुमारला भेटण्यासाठी ओडिशावरून नागेपल्ली येथे आला होता. रविवारी पहाटे सूरज पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी निघाला असता, सतीशकुमार त्याला सोडण्यासाठी स्वतःच्या कारने छत्तीसगड सीमेमार्गे ओडिशाच्या दिशेने निघाला. वाटेत देवदा गावाजवळ पोहोचल्यावर सतीशकुमारच्या वैवाहिक आयुष्यावरून आणि त्यांच्यातील संबंधांवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, रागाच्या भरात सूरजने आपल्याजवळील चाकू काढून सतीशकुमारवर वार करण्यास सुरुवात केली.
चाकूचे सपासप वार केल्याने आणि गळा चिरल्याने सतीशकुमारचा जागीच मृत्यू झाला. सूरजने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक गावकऱ्यांनी तत्परता दाखवत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच हालेवारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दाबेराव आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी सूरज हलदार सध्या पोलीस कोठडीत असून, त्याला उपचारासाठी एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











