गाडी विहिरीत पडताच इरफानने उडी मारली, पाच जीव वाचवले

Pandharpur tragic accident : पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील चौगुले कुटुंबाचा पिकअप विहिरीत कोसळून भीषण अपघात झालाय. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Pandharpur tragic accident

Pandharpur tragic accident

मुंबई तक

15 Jun 2026 (अपडेटेड: 15 Jun 2026, 10:11 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गाडी विहिरीत पडताच इरफानने उडी मारली

point

पाच जीव वाचवले, नेमकं काय घडलं?

Pandharpur tragic accident : पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील चौगुले कुटुंब मसवडच्या सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतत असताना, पंढरपूर जवळच एका भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब प्रवास करत असलेला पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याने ही हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विहिरीत उड्या टाकून सात जणांचे प्राण वाचवले, मात्र आठ जणांना वाचवण्यात दुर्दैवाने यश आले नाही. या घटनेमुळे संपूर्ण रांजणी गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का?

जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर आणि रस्ते सुरक्षा व्यवस्थेवर कडाडून टीका केली आहे. ही विहीर रस्त्याला लागून असूनही तिला कोणताही संरक्षक कठडा किंवा बॅरिकेड्स नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप गावकरी करत आहेत. याच रस्त्यावर यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, प्रशासनाने वारंवार मागणी करूनही सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. रस्ते काम करणाऱ्या कंत्राटदाराची आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची ही मोठी चूक असल्याचे सांगत, जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इरफानची जिवाची पर्वा न करता विहिरीत उडी

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या इरफान मुजावर या स्थानिक युवकाने जिवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेतली आणि काहींचे प्राण वाचवले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, पिकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या असुरक्षित विहिरींमुळे येथे नेहमीच अपघातांचे सावट असते. गेल्या काही दिवसांत याच परिसरात अशाच प्रकारची आणखी एक घटना घडल्याचेही स्थानिकांनी सांगितले. सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या अभावामुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास मृत्यूचा सापळा बनला असून, प्रशासनाच्या यंत्रणेवर कोणीही नसल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली.

या भीषण दुर्घटनेनंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलवून उपचार सुरू करण्यात आले आहेत. खासदार मोहिते पाटील यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत, जिल्ह्याभरातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या अशा धोकादायक विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सुरक्षेसाठी तातडीने बॅरिकेडिंग आणि विहिरी बंद करण्याचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र, निष्पाप लोकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येते, हा प्रश्न कायम आहे.