vasai crime news, प्रवीण नलावडे : वसई परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. फुटबॉलमध्ये करिअर घडवण्याचे स्वप्न दाखवून एका 17 वर्षीय मुलीचे शोषण करण्यात आले आहे. अभिजित मेंडल (वय 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रशिक्षकाचे नाव असून, तो वसई भागात खासगी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र चालवतो.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टबाबत टिप्पणी करणाऱ्या सेजल पवारला झटका, KEM ची मोठी कारवाई
मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार
पीडित मुलगी 2023 मध्ये प्रशिक्षणासाठी त्याच्याकडे गेली होती. प्रशिक्षकाने तिला फुटबॉल क्षेत्रात मोठी संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. तीन वर्षांच्या कालावधीत त्याने मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची गंभीर तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा : मुलीला बॉयफ्रेंडसोबत रहायचं होतं, वडिलांनी काय केलं बघा...
व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन अत्याचार
या नराधमाने केवळ अल्पवयीन मुलीवर अत्याचारच केले नाहीत, तर त्या अत्याचाराचे व्हिडिओ आणि फोटो काढून तिला ब्लॅकमेलही केले. काही काळानंतर जेव्हा पीडित मुलीने प्रशिक्षकापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने हे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला पुन्हा आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या या अश्लील धमक्यांमुळे पीडित मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली आली होती. अखेर तिने धैर्याने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांच्या कानावर घातला, ज्यामुळे या क्रूर कृत्याचा पर्दाफाश झाला.
कुटुंबीयांच्या मदतीने पीडित मुलीने माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी अभिजित मेंडल याच्यावर बलात्कार, धमकावणे आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या (POCSO) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या घटनेमुळे वसईच्या क्रीडा वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पालकांमध्येही आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीने अशा प्रकारे अन्य कोणाचे शोषण केले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पीडितेच्या जबाबानुसार पोलीस पुरावे गोळा करत आहेत. या घटनेने क्रीडा प्रशिक्षकाच्या नात्यातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीवर जलदगतीने खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींना धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT











