सांगली : 13 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या, आरोपी मैत्रिणीसोबत लॉजवर सापडला!

Sangli Crime News : सांगलीत हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या हत्येतील मुख्य सूत्रधार निलेश गडदे याला पोलिसांनी कर्नाटक सीमेवरील एका लॉजवरून अटक केली आहे.

Sangli Crime News

Sangli Crime News

मुंबई तक

15 Jun 2026 (अपडेटेड: 15 Jun 2026, 09:38 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सांगली : 13 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या

point

आरोपी मैत्रिणीसोबत लॉजवर सापडला!

Sangli Crime News : सांगली शहरात घडलेल्या वेदांत बंडगर या लहान मुलाच्या हत्या  प्रकरणातील मुख्य सूत्रधार नीलेश विठोबा गडदे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. कर्नाटक सीमेवरील एका लॉजवर आपल्या मैत्रिणीसह लपून बसलेल्या नीलेश गडदेला पोलिसांनी एका धाडसी कारवाईत ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता, मात्र पोलिसांच्या पाच पथकांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर त्याला शोधण्यात यश आले.  या प्रकरणातील अन्य तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : सोलापूर हळहळलं, विहिरीत पिकअप कोसळून 8 भाविकांचा मृत्यू; माळशिरसमधील घटना

कामाचा ठेका मिळण्यावरुन सुरु झालेला वाद 

या भीषण गुन्ह्याच्या मुळाशी रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून सुरू असलेला वाद असल्याचे तपासातून समोर आले आहे. मालधक्क्याच्या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे होता आणि हे काम सोडावे म्हणून निलेश गडदे त्यांच्यावर सातत्याने दबाव आणत होता. बुधवारी रात्री गडदेने आपल्या साथीदारांसह खरात यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला धमकावले आणि खंडणीची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे पोहोचले आणि गडदेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता, ज्यात हमालांनी गडदे समर्थकांच्या वाहनांवर दगडफेक केली होती.

हेही वाचा : तरुण भाचीसोबत बोलायचा, मामाने केलं कांड; नेमकं काय घडलं?

13 वर्षीय निष्पाप मुलावर गोळ्या झाडल्या 

या दगडफेकीमुळे चिडलेल्या नीलेश गडदेने बाळासाहेब बंडगर यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने थेट सांगली गाठली. मात्र, रागाच्या भरात असतानाच, अंगणात मोबाईल पाहत बसलेल्या बाळासाहेब बंडगर यांचा निष्पाप नातू वेदांत याच्यावर त्याने गोळ्या झाडल्या. या अमानुष हल्ल्यात वेदांतचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर संजयनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हत्येनंतर नीलेश गडदे शहरातून पसार झाला होता, पण एलसीबीच्या पथकाला तो कर्नाटक सीमेवरील एका लॉजमध्ये वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती मिळाली, त्यानंतर ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

नीलेश गडदेच्या अटकेनंतर त्याला रात्री उशिरा सांगलीत आणण्यात आले असून पोलीस आता त्याची कसून चौकशी करत आहेत. या गुन्ह्यातील इतर तीन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. वेदांत बंडगरच्या हत्येमुळे सांगलीत संतापाची लाट उसळली होती आणि मुख्य सूत्रधार गजाआड झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, फरार आरोपींनाही लवकरच पकडण्यात येईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.