Parbhani Crime News : परभणी पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस शिपायाची छेड काढल्याच्या गंभीर प्रकरणासह कर्तव्यात निष्काळजीपणा आणि बेशिस्त वर्तनाची मालिका समोर आल्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) विशाल शिवाजीराव लाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी त्यांच्याविरोधातील तपास अहवालाचा अभ्यास करून निलंबनाचे आदेश काढले. या घटनेमुळे पोलिस दलातील शिस्त आणि महिला सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय विशाल लाड यांच्यावर महिला शिपायाशी अनुचित वर्तन केल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाखल झाली होती. महिला शिपायाने केलेल्या तक्रार अर्जात छेडछाडीचे प्रसंग आणि कार्यस्थळी निर्माण झालेल्या असुरक्षित वातावरणाचा उल्लेख असल्याचे समजते. महिला कर्मचारी सुरक्षिततेबाबत शून्य सहनशीलता धोरण राबवणाऱ्या पोलिस विभागाने याकडे गांभीर्याने पाहिले. तक्रार मिळताच अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीदरम्यान केवळ छेडछाडीच्या तक्रारीच नव्हे तर कर्तव्यावर असताना निष्काळजीपणा, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांचे पालन न करणे, तसेच सहकाऱ्यांशी अयोग्य पद्धतीने वागणे अशा इतरही गैरवर्तनाच्या बाबी समोर आल्या. या घटनांची साखळी पाहता, विभागाने त्यांच्यावर तत्काळ प्रशासकीय कारवाई आवश्यक असल्याचे मत नोंदवले.
पोलिस दलातील अधिकाऱ्यांकडून शिस्तबद्ध वर्तणुकीची अपेक्षा असताना अशा प्रकारची प्रकरणे उघडकीस येणे चिंताजनक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. महिला कर्मचारी संरक्षणाचे महत्व अधोरेखित करत, कोणत्याही प्रकारची छेडछाड किंवा गैरवर्तन सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विशाल लाड यांच्या विरोधातील निलंबन तात्पुरते असून पुढील चौकशीअंती अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. निलंबन काळात त्यांना कुठल्याही प्रकारचे पोलिस कर्तव्य देण्यात येणार नाही. चौकशी समितीने आवश्यक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे. परभणी पोलिस मुख्यालयातील या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पुढील चौकशी अहवाल काय निष्कर्ष देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











