प्रेमानंद महाराजांचे गुरु कोण? इंटरनेटवर अचानक का होतंय सर्वात जास्त सर्च

मुंबई तक

18 Oct 2025 (अपडेटेड: 18 Oct 2025, 10:14 AM)

premanand maharaj : प्रेमानंद महाराजांचे गुरु कोण आहेत? इंटरनेटवर सर्वात जास्त होतंय सर्च

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रेमानंद महाराजांचे गुरु कोण आहेत?

point

इंटरनेटवर सर्वात जास्त होतंय सर्च

premanand maharaj : मथुरा-वृंदावन येथील संत प्रेमानंदजी महाराज यांच्या प्रकृतीबाब सध्या अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यांच्या आरोग्याविषयीच्या बातम्यांमुळे संपूर्ण सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अलीकडेच एक अत्यंत भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वृंदावनधामातील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज हे दुसऱ्या एका संतांच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हजारो लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की अखेर ते संत कोण आहेत, ज्यांच्याप्रती प्रेमानंद महाराज इतका आदर आणि भक्तीभाव व्यक्त करत आहेत.

हे वाचलं का?

खरं तर, ज्या संतांना पाहून प्रेमानंद महाराज स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता उभे राहिले, दंडवत नमस्कार केला, त्यांच्या स्वतःच्या हातांनी पाय धुतले आणि त्यांनाच आपल्या गादीवर बसवलं ते म्हणजे प्रेमानंदजींचे आध्यात्मिक गुरु आहेत. स्वतः आजारी असूनही त्यांनी केवळ वंदन केलं नाही, तर आपल्या गुरुंना सर्वतोपरी सन्मान देऊन त्यांना गादीवरही बसवलं. हे पाहून उपस्थित अनेक जण भावुक झाले आणि इंटरनेटवर या गुरुजींबद्दल माहिती शोधू लागले. तर जाणून घेऊ या की प्रेमानंद महाराजांचे गुरु कोण आहेत, ज्यांच्याबद्दल सध्या सर्वजण जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांची अजितदादांवर कुरघोडी, सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपने गळाला कसे लावले?

भावनिक भेटीचा व्हिडिओ झाला व्हायरल

या व्हिडिओमध्ये दिसतं की गुरु शरणानंद महाराज, जे वृंदावनमधील रमणरेती महावन आश्रमाचे प्रमुख संत आहेत, ते प्रेमानंदजींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी केली कुंज आश्रमात आले होते. प्रेमानंदजींनी आपल्या गुरुंना पाहताच तात्काळ उठून साष्टांग दंडवत प्रणाम केला. त्यानंतर त्यांनी आपल्या गुरुंना गादीवर बसवलं, त्यांच्या पायांना पाणी घालून स्वच्छ केलं. पाय पुसले आणि आरती केली. या प्रसंगी दोन्ही संतांच्या डोळ्यांत अश्रू होते, आणि ही भेट पाहून आश्रमात उपस्थित सर्व भाविकांच्या डोळ्यांतही पाणी आलं.

गुरु शरणानंद कोण आहेत?

गुरु शरणानंदजी महाराज हे वृंदावनमधील रमणरेती महावन आश्रमाचे प्रमुख संत आहेत. ते अत्यंत विनम्र, तपस्वी आणि अध्यात्मात पूर्णपणे रमलेले संत मानले जातात. त्यांनी अनेक वर्षे साधना केली आहे आणि त्यांचे प्रवचन भाविकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. प्रेमानंद महाराजांच्या जीवनात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते फक्त गुरु नाहीत, तर एक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहेत.

प्रेमानंद महाराज आपल्या प्रवचनांमध्ये नेहमी आपल्या गुरुंचा उल्लेख करतात आणि त्यांच्या शिकवणीचा स्वीकार करतात. आजच्या काळात प्रेमानंद महाराज हे सर्वाधिक लोकप्रिय आणि फॉलो केले जाणारे संत आहेत. त्यांच्या प्रवचनांना कोट्यवधी लोक सोशल मीडियावर ऐकतात. पण या व्हिडिओने सर्वांना दाखवून दिलं की, ते आपल्या गुरुंसमोर किती विनम्र आणि समर्पित आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा भक्तिभाव आणि श्रद्धा स्पष्टपणे जाणवत होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पतंग आणण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडला, परत येताना आनंद गगनात मावेना; पण 9 वर्षीय कनिष्कासोबत आक्रित घडलं