Pune Crime : आळंदी परिसरात गुरुवारी (2 एप्रिल) सकाळी उघडकीस आलेल्या धक्कादायक दुहेरी हत्याकांडाचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. 6 वर्षांची चिमुरडी धनश्री केदारी आणि 70 वर्षीय वृद्ध महिला मंगल शिंदे यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने आळेफाटा येथून अटक केली आहे. विनायक तुकाराम भवारी (वय 31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT
नवरा-बायकोमधील वादातून हत्या
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक भवारी हा संगीता केदारी यांचा पती आहे. काही कारणांमुळे दोघांमध्ये वाद चालू होता. संगीता या एका रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करतात. बुधवारी रात्री त्या नाईट ड्युटीवर असताना ही संधी साधून विनायक त्यांच्या घरी पोहोचला. यावेळी धनश्री ही मंगल शिंदे यांच्यासोबत घरी होती. परिचयाचा असल्याने आरोपीला घरात सहज प्रवेश मिळाला. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात सुरू असलेल्या वादातून ही घटना झाल्याचे समजते.
हे ही वाचा : नाशिक हादरले! दिंडोरीत भीषण अपघात, कार विहिरीत कोसळून 6 मुलांसह 9 जणांचा दुर्दैवी अंत
वृद्धेसह चिमुरडीचा बळी
विनायकला असा संशय होता की, मंगल शिंदे या संगीताला त्याच्याविरुद्ध भडकावत आहेत. याच रागातून बुधवारी मध्यरात्री त्यांच्यात वाद झाला आणि विनायकने रागाच्या भरात मंगल शिंदे यांचे डोके भिंतीवर आदळून त्यांची हत्या केली. त्यानंतर, या घटनेची कोणालाही माहिती कळू नये म्हणून भीतीपोटी त्याने झोपलेल्या 6 वर्षांच्या निष्पाप धनश्रीचेही उशीने तोंड दाबून प्राण घेतले. एका क्षुल्लक संशयापायी आरोपीने एका वृद्धेसह चिमुरडीचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : चिपळूणमधील आंब्याच्या बागेत जळालेल्या हाडांमागचं भयानक सत्य समोर, काय आहे मुंबई कनेक्शन? जाणून घ्या सविस्तर
दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आळेफाटा येथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. संगीता आणि विनायक यांची दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती आणि त्यांनी प्रेमविवाह केला होता. सध्या आळंदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ADVERTISEMENT











