Pune Crime news : सहकारी संस्थेकडून तब्बल आठ कोटींची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडत मोठी कारवाई केली आहे. लिक्विडेटर म्हणून काम पाहणारे विनोद देशमुख आणि त्यांना सहाय्य करणारे ऑडिटर भास्कर पोळ हे दोघेही तीस लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना जाळ्यात सापडले. या प्रकरणामुळे पुण्यातील सहकारी क्षेत्रातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ADVERTISEMENT
धनकवडी परिसरातील ‘एकता सहकारी संस्था’ या संस्थेत काही वर्षांपूर्वी आंतरिक मतभेद निर्माण झाले. सभासदांमध्ये तणाव वाढल्यानंतर संस्थेचा कारभार 2020 साली थेट सहकार विभागाकडे गेला. त्यानंतर 2024 मध्ये संस्थेच्या कामकाजासाठी विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली. संस्थेची पुण्यात मौल्यवान अशी मालमत्ता असल्याने तिच्या व्यवहारांबाबत अनेक निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र, या निर्णय प्रक्रियेत देशमुख यांनी सभासदांकडे अनधिकृत रकमेची मागणी सुरू केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संस्थेतील 32 सभासदांना शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तब्बल तीन कोटींची मागणी करण्यात आली होती. तसेच संस्थेच्या मालकीची जमीन विक्री प्रक्रियेला मंजुरी द्यायची असल्यास आणखी पाच कोटी रुपये घेण्याचा प्रयत्न देशमुख यांनी केला, अशी तक्रार एसीबीकडे करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मागणी आठ कोटींपर्यंत पोहोचत होती.
5 डिसेंबर 2025 रोजी संबंधित सभासदांनी पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक पडताळणीत लाच मागणी खरी असल्याचे दिसून आले. त्यानंतर तडजोडीअंतर्गत तीस लाख रुपये आगाऊ देण्याचे मान्य करण्यात आले आणि एसीबीने सापळा रचला. शनिवार पेठेतील तक्रारदारांच्या कार्यालयाजवळ व्यवहाराची वेळ ठरवण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे देशमुख यांनी पंचांसमक्ष तीस लाखांची रोख रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत देशमुख आणि पोळ यांना ताब्यात घेतले.
एसीबीचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सापळा रचण्यात आला होता. या कारवाईनंतर सहकारी क्षेत्रातील लिक्विडेशन प्रक्रियेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाच मागण्याची ही पहिली नोंद झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले. यामुळे सहकारी संस्थांतील पारदर्शकतेवर तसेच लिक्विडेटर नियुक्ती प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
विजेचा धक्का बसलेल्या भाचीला वाचवायला गेलेल्या मामासह चुलत बहिणीचा मृत्यू, संपूर्ण जळगाव हळहळलं
ADVERTISEMENT











