Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरज मार्केट परिसरातील महापालिका रुग्णालय आणि प्रसुतीगृहाच्या नजीक असलेल्या ड्रेनेज चेंबरमध्ये मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे पुरुष जातीचे अर्भक असून, त्याच्या शरीराला नाळ अजूनही जोडलेली होती. या घटनेमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, हे क्रूर कृत्य नेमके कोणी केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृत अर्भकाचा देह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
प्रसुतीगृहाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
ही घटना प्रसूतीगृहाच्या अगदी जवळ घडल्यामुळे या प्रकरणाकडे संशयाने पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित प्रसुतीगृहामध्ये 23 तारखेपासून कोणतीही प्रसूती झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे हे अर्भक नेमके कुठून आले आणि कोठून आणून ड्रेनेजमध्ये टाकले गेले, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. एखादे अर्भक जन्मानंतर मृत झाले असावे आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याची योग्य विल्हेवाट न लावता थेट ड्रेनेज चेंबरमध्ये फेकून दिले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. जर हे अर्भक रुग्णालयातील असेल, तर या गंभीर हलगर्जीपणाबद्दल दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. पोलीस आता रुग्णालयातील रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.
हेही वाचा : Personal Finance: 50 हजार पगार असणाऱ्यांसाठी कार घेताना ‘एवढाच’ ठेवावा EMI, नाहीतर…
अर्भकाचा मृत्यू नक्की कशामुळे?
मिरज शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महापालिका दवाखान्याच्या परिसरात अशी अमानवीय घटना घडल्याने आरोग्याच्या सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. डॉक्टरांच्या मते अर्भक हे साधारणपणे तीन दिवसांचे असावे. आता शवविच्छेदन अहवालानंतरच अर्भकाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. मिरज शहर पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. दोषींना लवकरच शोधून काढू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही दुर्दैवी घटना मिरज, जिल्हा सांगली येथे घडली आहे.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील याबाबत बोलताना म्हणाल्या, "ड्रेनेज तुंबल्यामुळे सफाई सुरु करण्यात आली होती. त्यावेळी आम्हाला साधारण 7 वाजण्याच्या दरम्यान एक अर्भक सापडलंय. ते पुरुष जातीचे अर्भक आहे. ड्रेनेज विभागाच्या लोकांनी सांगितल्यानंतर ते अर्भक बाहेर काढण्यात आलंय. पोस्टमॉर्टेम करण्यासाठी ते सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलंय. येथील सर्व स्टाफची चौकशी पोलिसांमार्फत होईल. चौकशीनंतरचं यामागे काय घडलंय? ते समजेल."
ADVERTISEMENT











