सांगली : मद्यधुंद इनोव्हा चालकाने 15 जणांना उडवलं, टिळक चौकातील घटनेनंतर ड्रायव्हरला नागरिकांकडून चोप

Sangli Hit and Run : या अपघातात नागरिकांसह वाहतूक पोलिस जखमी झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. संतप्त नागरिकांनी एकत्र येत इनोव्हा कारची तोडफोड केली. यावेळी मद्यधुंद चालकाला नागरिकांनी बेदम चोप दिला. मारहाणीत तोही जखमी झाल्याने त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यासह एकूण 15 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sangli Hit and Run

Sangli Hit and Run

मुंबई तक

02 Feb 2026 (अपडेटेड: 02 Feb 2026, 10:32 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सांगली : मद्यधुंद इनोव्हा चालकाने 15 जणांना उडवलं

point

टिळक चौकातील घटनेनंतर ड्रायव्हरला नागरिकांकडून चोप

Sangli Hit and Run : सांगली शहरात रविवारी (दि.1) रात्री एक धक्कादायक घटना घडली असून, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या इनोव्हा कार चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत गणपती पेठ ते टिळक चौक या मार्गावर रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना जोरदार धडक दिली. या घटनेत 14 ते 15 जण जखमी झाले असून, त्यामध्ये चार वाहतूक पोलिसांचा समावेश आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीत कृष्णामाई महोत्सव सुरू असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याच दरम्यान, गणपती पेठ परिसरातून एक इनोव्हा कार भरधाव वेगात येत नागरिकांना आणि पोलिसांना धडक देत पुढे जात राहिली. या गाडीने पटेल चौक मार्गे गणपती मंदिर परिसर ओलांडत टिळक चौकाच्या दिशेने जाताना अनेकांना धडक दिल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

या अपघातात नागरिकांसह वाहतूक पोलिस जखमी झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. संतप्त नागरिकांनी एकत्र येत इनोव्हा कारची तोडफोड केली. यावेळी मद्यधुंद चालकाला नागरिकांनी बेदम चोप दिला. मारहाणीत तोही जखमी झाल्याने त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यासह एकूण 15 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेबाबत माहिती देताना वाहतूक पोलिसांनी सांगितलं, "सांगलीत कृष्णामाई महोत्सव सुरु असताना आम्हाला बंदोबस्तासाठी नेमण्यात आलं होतं. बंदोबस्तासाठी उभारलेलो असताना पाठीमागून इनोव्हा कारने आम्हाला धडक दिली. यामध्ये 14 ते 15 जखमी झाले आहेत. पटेल चौकमार्गे, गणपती मंदिर मार्गे तो टिळक चौकाकडे येत होता. मोठी गर्दी होती, आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत होतो, त्यावेळी हा प्रकार घडला", असं वाहतूक पोलीसांनी सांगितलं.

दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयात भेट दिली. नगरसेवक उदय बेलवलकर यांनी घटनेची सविस्तर माहिती देताना सांगितलं, "इनोव्हा कारवाला गणपती पेठेतून सर्वांना धडकत आला. 15 ते 20 जणांना त्याने धडक दिलीये. सहा पोलीस देखील गंभीर जखमी झाले आहेत. इनोव्हा कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. आम्ही सर्व जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून उपचार सुरु केले आहेत. बऱ्याच जणांना डोक्याला लागलेलं आहे. सिटीस्कॅन करणे सुरु आहे. पायाला आणि कंबरेला दुखापत झालेलेही लोकं आहेत", अशी माहिती नगरसेवक उदय बेलवलकर यांनी दिली.

या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. मद्यधुंद चालकाविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनेचा अधिक तपास सांगली पोलिसांकडून केला जात आहे. या अपघातामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'...नाहीतर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो', 'त्या' विधानाने मोठी खळबळ.. NCP विलिनीकरणावर CM फडणवीस असं का म्हणाले?
 

    follow whatsapp