बीड / रोहिदास हातागळे : परळी शहरातील मिलिंद नगर परिसरात दारू व मोबाईलसाठी पैशांची मागणी नाकारल्याच्या रागातून नातवानेच आपल्या आजोबांचा मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिस चौकशीतून खरा प्रकार समोर आला असून, यानंतर आरोपी नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मिलिंद नगर येथे वास्तव्यास असलेले रामभाऊ गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची नोंद प्रथम आकस्मित म्हणून करण्यात आली होती. मात्र मृत्यूच्या परिस्थितीबाबत काही संशयास्पद बाबी आढळून आल्याने संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी सुरू केली. तपासादरम्यान मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात मृत रामभाऊ गायकवाड यांच्या पत्नी द्रौपदीबाई गायकवाड यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार नातू शुभम बाळू गायकवाड (वय 27, रा. मिलिंद नगर, परळी) हा दारू पिण्यासाठी आणि मोबाईलसाठी वारंवार पैशांची मागणी करत होता. संबंधित दिवशीही त्याने पैशांची मागणी केली होती. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने आजोबांशी वाद घातला.
वादाचे रूपांतर पुढे हिंसाचारात झाले. आरोपी शुभम गायकवाड याने रामभाऊ गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे चौकशीत समोर आले. या मारहाणीत रामभाऊ गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली. उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवत सखोल चौकशी केली असता आरोपीचा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण प्रकार स्पष्ट झाला.
या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 17/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शुभम बाळू गायकवाड सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. या खुनप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे हे करत असून, संपूर्ण घटनेचा तपशीलवार तपास करण्यात येत आहे. नातेसंबंधाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परळी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











