Rohit Shetty Firing : सिंघम, गोलमाल अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानी काल रात्री झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली आहे. पडद्यावर आपल्या चित्रपटातून गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या शेट्टींच्या घराला खऱ्या आयुष्यात अज्ञात बदमाशांनी लक्ष्य केले. या खळबळजनक घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पोलीस आणि क्राइम ब्रँचने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'अर्थ' खात्याबाबत CM फडणवीसांचा मोठा निर्णय, सुनेत्रा पवारांना दिली 'ही' खाती पण...
मध्यरात्री घुमला 'शेट्टी टॉवर'
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार आणि रविवारच्या दरम्यानच्या रात्री साधारण 12.30 ते 1 च्या सुमारास घडली. जुहूच्या उच्चभ्रू भागातील 'शेट्टी टॉवर'मध्ये सर्व काही शांत असताना अचानक गोळ्यांच्या आवाजाने शांतता भंग झाली. हल्लेखोर किती संख्येने होते आणि कोणत्या वाहनाने आले होते, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र दहशत पसरवण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होता. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले.
पोलिस तपास काय सांगतो?
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि मुंबई गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. हल्लेखोरांच्या पळण्याच्या मार्गाचा शोध घेण्यासाठी पोलीस 'शेट्टी टॉवर' आणि आसपासच्या इमारतींमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच, फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरून गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, इमारतीवर गोळीबार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा : अजितदादा आणि सुनेत्रा पवार दोघांनी 'एकाच' पदासाठी रचलाय भन्नाट रेकॉर्ड!
कोण आहे रोहित शेट्टी?
रोहित शेट्टी हे बॉलिवूडमधील एक अत्यंत यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. सिंघम, गोलमाल, आणि चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या सुपरहिट अॅक्शन आणि विनोदी चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. चित्रपटांमध्ये गाड्यांचा वापर आणि जबरदस्त स्टंट्स ही त्यांची खासियत आहे. रोहित शेट्टी हे 'खतरों के खिलाडी' या लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोचे होस्ट आहेत.
ADVERTISEMENT











