Satara News : साताऱ्यात प्रचाराच्या नावाखाली महिलांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरवरून साताऱ्यात तब्बल 26 महिलांना एका अज्ञात इसमाच्या फोनवरून आणण्यात आलं. मात्र सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना घेण्यासाठी कोणीच न आल्याने या महिला सातारा एसटी बस स्थानकात उपाशीपोटी बसून होत्या. अखेर संताप अनावर झाल्यानंतर महिलांनी बस स्थानकातच आरडाओरडा सुरू केला. या महिलांचा आरोप आहे की, आम्हाला एकनाथ शिंदे गटाच्या प्रचारासाठी संभाजीनगरवरून साताऱ्यात आणण्यात आलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अजितदादांच्या अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्रित; प्रयागराजसह 'या' ठिकाणी होणार विसर्जन
पैशांचं अमिष दाखवून फसवणूक
एकनाथ शिंदे गटाच्या प्रचारासाठी संभाजीनगरवरून साताऱ्यात आणण्यात आल्याचं सांगत महिलांनी आरडाओरड सुरु केली. काही महिलांनी आरोप केली की, सात ते आठ दिवसांच्या मोर्चासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं. मात्र, साताऱ्यात पोहोचल्यानंतर ज्यांनी बोलावलं ते फोन उचलत नसल्याने अस्वस्थता निर्माण झाली.
महिलांचा नेमका आरोप काय?
छत्रपती संभाजीनगरहून आल्याचं महिलांनी सांगितलं. एकनाथ शिंदे गटाच्या एका मोर्चासाठी बोलावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पुढं त्या म्हणाल्या की, 'सकाळपासून आम्ही इथे उपाशी बसलोय. कोणीच घ्यायला आलेलं नाही. फोनही उचलत नाहीत.' दरम्यान, या प्रकारानंतर शिवसेना महिला पदाधिकारी बर्गे यांनी महिलांची भेट घेत, आमच्या पक्षाची बदनामी करू नका असं सांगितलं. तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून अधिकृतपणे खुलासा करण्यात आला असून, संभाजीनगरवरून साताऱ्यात या महिलांना आणण्यात आमच्या पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
हे ही वाचा : पुणे : 'तुझी अवस्था बाबा सिद्दिकींसारखी करू' गोल्डन मॅन सनी वाघचौरेला बिश्नोई गँगकडून धमकी, 5 कोटींच्या खंडणीची मागणी
महिलांना फसवणारा अज्ञात इसम कोण?
प्रचाराच्या नावाखाली महिलांना आणून वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार नेमका कोणी केला? संबंधित अज्ञात इसम कोण आहे? आणि या महिलांना न्याय कधी मिळणार? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT











