Ajit Pawar PSO Videep Jadhav Funeral ,सातारा : बारामती (पुणे) येथे 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील तरडगाव (ता. फलटण) येथील विदीप जाधव यांनी देखील जीव गमावलाय. त्यांच्यावर साताऱ्यातील मूळगावी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) म्हणून सेवा बजावत होते. या दुर्घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
काल सकाळी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विदीप जाधव हे देखील प्रवास करत होते. या अपघातात विदीप जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरडगाव गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
विदीप जाधव यांचे पार्थिव रात्री उशिरा त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे आणण्यात आले. रात्री साडे अकराच्या सुमारास तरडगाव येथील पालखी स्थळावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या सलामी देऊन त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्ययात्रेदरम्यान गावातील वातावरण अतिशय भावनिक झाले होते.
अंत्यसंस्काराच्या वेळी विदीप जाधव यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, गावकरी तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी आपण गमावल्याची भावना सर्वांमध्ये होती.
विदीप जाधव हे आपल्या कामाबाबत अत्यंत निष्ठावान आणि जबाबदार अधिकारी म्हणून ओळखले जात होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी ते पार पाडत होते. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलातही तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि मित्रांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. या दुर्घटनेनंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातूनही शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यातील तरडगाव गावावर शोककळा पसरली असून, गावातील प्रत्येक नागरिक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाला आहे.
बारामतीतील भीषण विमान अपघातात साताऱ्याचा सुपुत्र गमावल्याने जिल्हाभरातून हळहळ व्यक्त होत असून, विदीप जाधव यांचे कर्तव्य आणि सेवा कायम स्मरणात राहतील, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'पप्पा, मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार...', शेवटचा कॉल आठवून पिंकी माळीच्या वडिलांनी हंबरडा फोडला
ADVERTISEMENT











