LIVE Update: "कोणतीही व्यक्ती ही काळाचे अपत्य असते.. मात्र, अजित पवार हे काळाचे नेते होते....", जितेंद्र आव्हाडांना शोक अनावर

बारामतीत लँडिंगच्या वेळी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली असून मृतांमध्ये 2 क्रू आणि 2 कर्माचाऱ्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

28 Jan 2026 (अपडेटेड: 28 Jan 2026, 01:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीत झालेल्या प्लेन क्रॅशमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू

point

राज्यातील मंत्र्यांची भावूक प्रतिक्रिया

Ajit Pawar Death: अजित पवार यांची आज (दि.28) बारामतीत प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र, बारामती विमानतळावर उतरत असतानाच हे विमान अपघातग्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे. नियंत्रण सुटल्याने हे विमान विमानतळाच्या परिसरातील एका शेतात कोसळले. अपघातानंतर घटनास्थळी धुराचे मोठे लोट उठताना दिसून आले, त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पाहा, या भीषण घटनेचे लाईव्ह अपडेट्स... 

हे वाचलं का?

अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील मंत्र्यांना शोक अनावर 

- अजित दादांच्या निधनावर क्रिकेटर सचिन तेंडूलकर याचं ट्विट 

अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
 

- रामदास आठवलेंची भावूक पोस्ट 

"महाराष्ट्रच्या पुरोगामी गडाचा एक खंबीर बुरुज आज कोसळला आज माझे मन खूप हेलावले आहे. अजित पवार म्हणजे राजकारणातला एक 'पॉवरफुल' नेता, ज्यांच्या शब्दाला वजन होते आणि निर्णयाला धार होती. दादांचा प्रशासकीय धडाका आणि वेळेचे पालन हे सर्वांसाठीच आदर्श होते. ते स्पष्टवक्ते होते, मनात काहीही न ठेवता जे आहे ते तोंडावर बोलायचे. अशा या रोखठोक नेत्याचे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा गड आहे आणि या गडाचा एक खंबीर बुरुज आज कोसळला आहे. दादांनी नेहमीच दलित, कष्टकरी आणि वंचितांच्या प्रश्नांवर आपली ठोस भूमिका मांडली. रिपब्लिकन चळवळीबद्दल त्यांच्या मनात नेहमीच आपुलकी होती. सत्तेत असो वा विरोधात, त्यांचा शब्द हा अंतिम असायचा. त्यांच्या कार्याचा वारसा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. मी माझ्या पक्षातर्फे आणि वैयक्तिकरित्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो." 

- कोल्हापुरचे काँग्रेस पक्षाचे खासदार शाहू महाराज यांनी अजित पवारांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. 

"अजित पवारांचे आणि आमचे जवळजवळ 30 वर्षांचे संबंध होते. या 25-30 ते एक बहुजन समाजाचे महत्वाचे नेतृत्व म्हणून ते पुढे आले आहेत. गेल्या काही वर्षांत जरी त्यांचे आणि शरद पवारांचे काही मतभेद होते, मात्र ते वैचारिक मतभेद होते. खऱ्या अर्थाने ते सगळे एकच आहेत. सगळ्यांसाठी झटणारा एक महाराष्ट्राचा महत्त्वाचा नेता होता. अर्थव्यवस्थेचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. अनेक वर्ष अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते होते. शरद पवारांनी त्यांना असं चांगलं ट्रेनिंग दिलं होतं की, बहुजन समाजाचे नेतृत्व त्यांनी करावं...अशी व्यक्ती गेल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे." 

- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फलटणचे संजूबाबा नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि राष्ट्रवादीचा मोठा नेता हरपला अशा भावना व्यक्त केल्या. 

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही थोड्याच वेळात बारामतीसाठी रवाना होत आहेत. राज्यात आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

- अजित दादा पवारांच्या मृत्यूनंतर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया 

गुलाबराव पाटलांनी अजित दादांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं की, "महाराष्ट्रासाठी ही फार दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्राचा खरा दादा, बारामतीचा किल्लेदार, वक्तशीरपणाचा खरा माणूस, आमच्यातून निघून गेला आहे हे महाराष्ट्रासाठी फार मोठे नुकसान आहे. विकास हाच त्यांचा ध्यास होता ही महाराष्ट्राला न भरून निघणारी पोकळी आहे. अशा माझ्या लाडक्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली." ज्या दादा ने सगळ्यांना न्याय दिला परमेश्वराने त्या दादाला काय न्याय दिला नाही अशी भावुक प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे..

- अजित दादांच्या निधनानंतर नितेश राणे यांची भावूक प्रतिक्रिया  

अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना घडवणारे, त्यांना बळ देणारे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करताना मंत्री नितेश राणे हे भावूक झाले. मंत्रिमंडळात अजित दादांसोबत काम करताना त्यांच्या कार्यपद्धतीचा, प्रशासनावरच्या पकडीचा आणि धाडसी निर्णयक्षमतेचा अनुभव घेतल्याचे सांगत त्यांनी अजित दादांना अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

- डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विक करत व्यक्त केला शोक 

महाराष्ट्राच्या राजकारणात आता दादा नसतील ही जाणीवच अंगावर काटा आणणारी आहे. कामाचा प्रचंड आवाका आणि उरक असणारा हा लोकप्रिय लोकनेता नियतीने आज आपल्यापासून हिरावला.प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले…! अधिक लिहवत नाही. शब्द अपुरे आहेत आणि भावना गोठल्या आहेत. पवार कुटुंबियांच्या या दुःखद प्रसंगात आम्ही सहभागी आहोत.

- साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया 

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अजित दादांच्या निधनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, "एक स्पष्ट वक्ता नेता, अर्थमंत्री म्हणून काम करताना सर्व क्षेत्रांना न्याय आणि राज्याच हित याबाबत दादांची परखड भूमिका असायची. राजकारणात मतभेद असले तरी त्यांची आणि माझी मैत्री होती, दादांना भावपूर्ण श्रद्धांजली."

- भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली भावना 

अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे, अशी भावना भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. राज्याची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही, असं लोणीकर म्हणाले. अजित दादा अचानक निघून गेल्याने खूप वेदना आणि दुःख होत असल्याचं म्हणत अजित पवार सभागृहात आपली स्पष्ट भूमिका मांडायचे, असंही लोणीकर यांनी म्हटलय. राज्याच्या सभागृहात कधी तणाव झाला, वाद निर्माण झाले तर अजित दादा स्पष्ट भूमिका मांडायचे आणि सभागृह शांत व्हायचे; असं सांगत लोणीकर यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

- अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया 

अजित दादांच्या मृत्यूनंतर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की, "अजित पवार यांच्या जाण्याचा आपल्या धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने राज्याची आणि देशाची हानी झाली आहे. त्यांचे आपले संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. त्यांच्या काम करण्याची पद्धत ही आदर्श असल्याने, ते सगळ्यांच्या नेहमी स्मरणात राहणार आहेत." 

- अजितदादांच्या निधनावर बोलताना सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शोक व्यक्त केला 

अजित पवार यांच्या निधनाबद्दल बोलताना खासदार प्रणिती शिंदे भावूक झाल्या, त्या म्हणाल्या "अजित दादा म्हणजे महाराष्ट्राचे दादा होते, त्यांच्या निधनावर विश्वास बसत नाहीये, अजित दादांच्या कामाची पद्धत शिस्तबद्ध होती.9 ची मीटिंग असेल तर ते 10 मिनिटे आधीच हजर असायचे. बोरामणी विमानतळासाठी त्यांनी तात्काळ निधी मंजूर केला होता. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. बारामतीमध्येच त्यांच्या स्वतःच्या गावात हा अपघात होणे ही अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बाब आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित दादांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे." 

" अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

- महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे तीव्र दुःख झाले. "दिवंगत श्री अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो", असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

- भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांची प्रतिक्रिया 

अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्र मोठ्या लोकनेत्याला मुकल्याची भावना भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली आहे. अजित पवारांची प्रशासनावरील पकड आणि अभ्यास हा कायम विधिमंडळातील सर्वांना शिकण्यासारखा असल्याचं ते बोलले. 2014 ते 19 या काळात अजित दादा विरोधी पक्षात असूनही त्यांची देहबोली ही एखाद्या सत्ताधारी नेत्याला साजेशी अशीच असल्याचं ते म्हणाले. आज अजित पवारांचं जाणं आहे सहन करण्यापलीकडचं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

- अकोल्यातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया 

अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र खऱ्या आणि सच्चा लोकनेत्याला मुकल्याची भावना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केली आहे. अजित दादांचं जाणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला आणि कुटुंबाला उध्वस्त करणारं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अजित पवारांनी विकास काम करताना कधीच स्वपक्ष आणि विरोधी पक्ष असा भेदभाव केला नसल्याचं ते म्हणाले. . 

- आमदार विजयसिंह पंडित यांना अश्रू अनावर...

दोन दिवसांपूर्वी नांदेड येथे झालेल्या भेटीत विजयसिंह पंडित यांना सांगत होते मी जे सांगेल ते करायचं आपण बीडसाठी चांगलं काम करू असा विश्वास अजितदादांनी दिला होता. त्याचबरोबर अजितदादांनी जी पगडी घातली होती त्या पगडीमध्ये अजित दादा चांगले दिसत होते दादा आपण एक फोटो काढू तुम्ही चांगले दिसत आहात ह्या आठवणी ज्यावेळेस विजयसिंह पंडित यांच्या तोंडून बाहेर येत होत्या त्यावेळेस त्यांना हुंदका भरला होता. अश्रू अनावर झाले अत्यंत विश्वासू म्हणून विजयसिंह पंडित यांच्यावर बीड नगर परिषदेची जिम्मेदारी दिली होती ती त्यांनी योग्यरीत्या पार पडली आणि अत्यंत जवळचे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होतं आणि आज अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करताना विजयसिंह पंडित यांना अश्रू अनावर झाले. 

- जयश्री थोरात यांनी ट्विट करत दिली प्रतिक्रिया 

महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दादा' माणूस हरपला! प्रशासनावरील पकड आणि जनहितासाठी अहोरात्र कष्ट करणारा एक दूरदृष्टीचा नेता आज आपण गमावला आहे. राज्याच्या सार्वजनिक जीवनासाठी ही कधीही न भरून येणारी हानी आहे.

- बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत दिली प्रतिक्रिया 

कुशल प्रशासक आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम केले, त्यांच्या जाण्याने एक उमदा नेता आपण गमावलेला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. 

- राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

अजित पवारांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुःखद, दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्राची अपरिमितहानी झाली आहे, असं टोपे म्हणालेत. अजित पवार म्हणजे एक कर्तबगार नेता, संवेदनशील नेता, सामाजिक हित जाणणारा नेता, संघटन कौशल्य असणारा नेता, शिस्तप्रिय नेता, वक्तशील नेता, असं म्हणत टोपे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला नेता म्हणून अजित दादांची ओळख होती, असंही टोपे म्हणालेत. दरम्यान, अजित दादा म्हणजे जे बोलेल ते करणारा नेता, असं म्हणत टोपे यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

- अजित पवारांच्या मृत्यूनंतर विधानपरिषद आमदार इद्रीस नायकवडी यांना अश्रू अनावर

"अजितदादांच्या निधनाने सर्वांना सोबत घेऊन जाणारा, खरे बोलण्याचे धाडस आणि नैतिकता असणारा नेता हरपला आहे. सर्वांना न्याय देणारा सर्व समजघटकांना सोबत घेऊन चालणाऱ्या नेत्याला आज महाराष्ट्र हरवून बसला आहे. आज अत्यंत काळा दिवस, हा दिवस का उजाडला?" असा प्रश्न विचारत अतिशय भावुक होतं इद्रीस नायकवडी यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमासमोर व्यक्त केली आहे. 

- मनोज जरांगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं आहे की, "आपल्या दादाची दुःखद बातमी कळाली, मनाला पटत नाही... विश्वास बसायला तयार नाही की दादाचं अपघाती निधन झालं. असा नेता होणे नाही..." 

- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात बारामतीला रवाना होणार...

- भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया, "अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी ऐकल्यावर धक्का बसला, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी दिलीय. विकासाचं ध्यास असणारं नेतृत्व आज आमच्यातून गेलेलो आहे, अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली आहे. आज महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं असून महाराष्ट्राला अजितदादांची कायम आठवण राहील, अशी भावना व्यक्त करत दानवे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे."

- अजित पवारांविषयी विजय वड्डेटीवार यांची भावूक प्रतिक्रिया, "अजित दादा हे राजकारणात शब्द पाळणारे कुशल प्रशासक होते. जे होणार नाही ते स्पष्ट सांगणार..जे होणार ते काम करणार असे स्पष्टवक्ता नेते होते. मी ज्यावेळी मंत्रिमंडळात पहिल्यांदा आलो तेव्हा मी त्यांचा राज्यमंत्री होतो. त्यांनी विभागाचे कामकाज कसे वागायचे याचे धडे त्यांनी मला दिले. त्यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. 25 वर्षे त्यांच्याबरोबर काम केले. आज महाराष्ट्राच्या मातीतला मोठा नेता गमावला आहे. कल्पना पलीकडचे हे घडले आहे. एका लोकनेत्याला महाराष्ट्राने गमावले आहे." 

-वरळीतील सेन्चुरी क्वार्टरमधील रहिवासी असलेल्या श्री शिवकुमार माळी यांची कन्या श्रीमती पिंकी माळी यांचं या विमान अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पिंकी माळी या अपघातग्रस्त विमानात क्रू मेंबर होत्या. 

- भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना अश्रू अनावर. अजित पवारांच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी म्हटलं की, "पवार कुटुंबियांचे आणि आमचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. राजकीय परिस्थिती बदलली असेल परंतु आमच्यातील नाते कधी कमी झाले नाही. अजित दादा महाराष्ट्राचे धाडसी नेतृत्व होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे राज्याची फार मोठी हानी झाली आहे."

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीला रवाना

- अजित दादांच्या दुःखद निधनाच्या घटनेवर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर, अजित दादांची आठवण सांगत आमदार खोतकर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दादांच्या मृत्यूची घटना मनाला चटका लावणारी आहे, असं म्हणत महाराष्ट्र आज पोरका झाला, अशी भावना जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे. 

- कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया, "अतिशय स्पष्ट वक्ता, नेता म्हणून त्यांच्याकडे पहिलं जात होतं. कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारे ते नेते होते. असं होऊ नये, महाराष्ट्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही. मी देखील राष्ट्रवादीत काम केलं आहे. पवार कुटुंबाच्या खूप जवळ होतो , धनंजय महाडिकना मुन्ना म्हणू नका कारण ते खासदार आहेत, असं त्यांचं एका भाषणात वक्तव्य होतं हे कार्यरक्त्यावरच प्रेम होतं."

- अजित दादा पवार यांच्या अत्यंत दुर्दैवी अपघाताचे वृत्त समजताच धनंजय मुंडे हे तातडीने बारामती कडे रवाना झाले असून प्रवासादरम्यान  माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, "माझे वडील गेल्यानंतर दादानी कधी वडिल नाहीत याची जाणीव होऊ दिली नाही."

- आमचा कुटुंब प्रमुख गेला अशा भावनिक प्रतिक्रिया माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केले आहे. अजित दादांच्या खूप मोठ्या आठवणी आहेत. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह माजलगाव मतदार संघाचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया आमदार सोळंके यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

- अमरावतीच्या राष्ट्रवादी आमदार सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं की, "आमच्या नेत्याचे निधन खूप वेदनादायक आणि दुःखद आहे आणि मी यासंदर्भात अधिक काही बोलू शकत नाही." 

- अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी "उद्धवस्त" असं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून शोक व्यक्त केला. 

- कोल्हापूर आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, "महाराष्ट्रासाठी हा वेदनादायी दिवस आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अशा पद्धतीने मृत्यू झाला आणि यावर बोलण्यासाठी काही शब्द नाहीयेत. कर्तृत्व आणि नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे."

- अजित पवारांबद्दल पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, "अजित पवार जी हे लोकनेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी चांगले संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जायचा. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती."

- विमान अपघाताबाबत मोदींची X वरील प्रतिक्रिया, "महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताने दुःख झाले आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझे विचार आहेत. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो अशी प्रार्थना करतो." 

- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यूनंतर अनिल देशमुख यांना अश्रू अनावर झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात- "कुशल प्रशासक आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम केले, त्यांच्या जाण्याने एक उमदा नेता आपण गमावलेला आहे."

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया- "ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केल ते दादाचं आम्हाला सोडून गेले."

- भीषण विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त विमानात अजित पवार यांच्यासह आणखी 2 कर्मचारी (1 पीएसओ आणि 1 अटेंडंट) आणि 2 क्रू (पीआयसी+एफओ) सदस्य होते. सुरुवातीच्या माहितीनुसार, या अपघातात कोणीही वाचलेलं नाही.

- सुरुवातीच्या माहितीनुसार, या अपघातात कोणीही वाचलेले नाही.

- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते बारामतीला पोहोचणार

- विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती 

- सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीहून बारामतीला रवाना 

- या दुर्घटनेत विमानातील काही जण जखमी झाल्याचे वृत्त असून, अजित पवार यांनाही गंभीर दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार हे बारामती आज तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी चार वेगवेगळ्या सभांना संबोधित करणार होते. मात्र, अपघातामुळे त्यांचा हा दौरा अर्धवट राहिल्याची शक्यता आहे.  

- बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी विमानाचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. नियंत्रण सुटल्याने हे विमान विमानतळाच्या परिसरातील एका शेतात कोसळले.

    follow whatsapp