'पप्पा, मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार...', शेवटचा कॉल आठवून पिंकी माळीच्या वडिलांनी हंबरडा फोडला
बारामतीत झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत वरळीतील रहिवासी असलेली आणि फ्लाइट अटेंडंट म्हणून कार्यरत असलेल्या पिंकी माळीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कळल्यानंतर, तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. दरम्यान, पिंकीचे वडील शिवकुमार माळी यांनी आपली दु:खद प्रतिक्रिया व्यक्त केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेवटचा कॉल आठवून पिंकी माळीच्या वडिलांनी हंबरडा फोडला
'पप्पा, मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार...'
Pinki Mali in Baramati Plane Crash: बारामतीत झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत NCP नेते अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. यामध्ये दोन पायलट आणि क्रू मेंबर्सचा देखील समावेश आहे. या दुर्घटनेत वरळीतील रहिवासी असलेली आणि फ्लाइट अटेंडंट म्हणून कार्यरत असलेल्या पिंकी माळीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कळल्यानंतर, तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. दरम्यान, पिंकीचे वडील शिवकुमार माळी यांनी आपली दु:खद प्रतिक्रिया व्यक्त केली. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, या घटनेच्या आदल्या रात्री त्यांना पिंकीचा फोन आला होता आणि तिने बारामतीला जाणार असल्याचं सांगितलं.
फोनवर पिंकी काय म्हणाली?
पिंकीने तिच्या वडिलांना फोन केला आणि म्हणाली की, "पप्पा, मी आज अजितदादा पवारांसोबत बारामतीला जाणार आहे आणि तिथे त्यांना सोडून मी नांदेडला जाणार. मग हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मी तुम्हाला फोन करते." मात्र, सकाळपर्यंत सगळं काही बदललं. बारामतीजवळ एक विमान कोसळलं आणि शिवकुमार माळी यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पिंकी एक फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती आणि ती कुटुंबाची आशा होती. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कठोर परिश्रम केले. तिचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांचा अजित पवारांशी जुना परिचय होता.
अपघाताची बातमी मिळताच सर्वत्र गोंधळ उडाला. नातेवाईक, शेजारी आणि मित्र सर्वजण पिंकीच्या घरी येऊ लागले. आता पिंकी माळीचं पार्थिव मुंबईत आणले जाईल जेणेकरून तिच्यावर अंत्यसंस्कार करता येतील. दरम्यान, तिच्या वडिलांनी सांगितलं की, पिंकी गेल्या आठ वर्षांपासून फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती. तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात अंधेरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केली, जिथे तिने तीन वर्षे सेवा केली. शिस्त आणि तिच्या मेहनतीच्या जोरावर तिचं पुढे प्रमोशन झालं आणि ती कलीना, सांताक्रूझ येथील प्रायव्हेट चार्टर्ड फ्लाइट ऑपरेशनमध्ये सहभागी झाली. मागील 5 वर्षांपासून ती व्हीआयपी चार्टर्ड फ्लाइट्समध्ये कार्यरत होती.
राष्ट्रपतींसोबतही चार्टर्ड विमानांत ड्यूटी
वडिलांनी सांगितलं की पिंकीने अजित पवारांसोबत चार वेळा विमानाने प्रवास केला होता. तिने देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, प्रल्हाद मोदी (पंतप्रधान मोदींचे भाऊ) आणि अगदी राष्ट्रपतींसोबतही चार्टर्ड विमानांत ड्यूटी केली. एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या असूनही, तिने कधीही अभिमान दाखवला आणि तिने प्रत्येक उड्डाण अत्यंत प्रामाणिकपणे केलं. तिला पाहून आम्हाला खूप अभिमान वाटत असल्याचं तिचे वडील म्हणाले.










