Pune Golden Man : 'गोल्डन मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले सनी नाना वाघचौरे यांना बिश्नोई गँगकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'पैसे न दिल्यास तुझी अवस्था बाबा सिद्दिकींसारखी करू' अशी थेट धमकी गँगचा सदस्य शुभम लोणकर याने दिल्याचा आरोप सनी वाघचौरे यांनी केला आहे. या घटनेनंतर सनी वाघचौरे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. आपल्या जीवाला गंभीर धोका असून तातडीने कारवाई करावी आणि पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.
ADVERTISEMENT
सनी नाना वाघचौरे हे सार्वजनिक आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये अंगावर 2 ते 3 किलो सोन्याचे दागिने घालून वावरतात, यामुळेच त्यांना 'गोल्डन मॅन' म्हटले जाते. 6 जानेवारी रोजी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सोशल मीडियावर त्यांचे सुमारे 2.5 कोटी फॉलोअर्स आहेत.
हे ही वाचा : अजित दादांना कालच अग्नी दिलाय, त्यांच्या नावानं राजकारण करणं अमानुष..' संजय राऊतांनी व्यक्त केला संताप
धमकीचा संपूर्ण घटनाक्रम
25 जानेवारी : सायंकाळी 7:22 वाजता एका आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून सनी वाघचौरे यांच्या व्हॉट्सॲपवर कॉल आला, जो त्यांनी उचलला नाही. त्यानंतर 'शुभम लोणकर, कॉल मी' असा मेसेज आला. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कॉस आला. त्यांनी हा व्हॉट्सॲप कॉल रिसीव्ह केल्यावर समोरून सांगण्यात आले की, 'मी बिश्नोई गँगचा शुभम लोणकर बोलतोय. गुगलवर सर्च करून बघ बिश्नोई गँग कोण आहे. बाकी बोलणे मेसेजवर होईल' असे म्हणून कॉल कट झाला.
सुरुवातीला कोणीतरी थट्टा करत असावे असे वाटल्याने वाघचौरे यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर वेगवेगळ्या क्रमांकावरून वारंवार कॉल येऊ लागले. 26 जानेवारी रोजी सकाळी 7:21 वाजता एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून थेट धमकीचा मेसेज आला, ज्यामुळे ते हादरून गेले. 5 कोटींच्या खंडणीसाठी 5 दिवसांची मुदत देण्यात आली असून पैसे न दिल्यास बाबा सिद्दिकींसारखी हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे.
हे ही वाचा :
बिश्नोई गँगने पाठवलेला धमकीचा मेसेज :
'राम राम, मी शुभम लोणकर. लॉरेन्स बिश्नोई ग्रुपमधून आहे. माझी माहिती काढून घे. सनी, तुझ्याकडून 5 कोटी रुपये हवे आहेत. कुठेही पळून जा, जगातील कोणतीही ताकद तुला वाचवू शकत नाही. तुझ्याकडे 5 दिवसांचा वेळ आहे. तयार राहा, गोळी कशीही येऊ शकते. जर तुझे उत्तर आले नाही, तर तुझी अवस्था बाबा सिद्दिकींसारखी करू. आणि तू जेवढं सोनं घालतोस ना, त्यापेक्षा दुप्पट पितळ गोळ्या तुला घालू. लक्षात ठेव – आरजू बिश्नोई.'
या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून धमकी देणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT











