अजितदादा आणि सुनेत्रा पवार दोघांनी 'एकाच' पदासाठी रचलाय भन्नाट रेकॉर्ड!
अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री या पदासाठी वेगवेगळा असा विक्रम रचला आहे. नेमका काय आहे हा रेकॉर्ड जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज (31 जानेवारी) एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नेत्यांच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर दुपारी 5 वाजता राजभवनात आयोजित शपथविधी सोहळ्यात सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा क्षण केवळ पवार कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी ऐतिहासिक आहे. कारण महाराष्ट्राच्या 65 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. यासोबतच, दिवंगत नेते अजित पवार यांच्या सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाच्या विक्रमाला जोडून सुनेत्रा पवार यांनी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
अजित पवारांचा अद्वितीय विक्रम
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळा शपथ घेतली होती, जो एक विक्रम आहे. त्यांचा हा प्रवास विविध पक्षांच्या आघाडी सरकारांमध्ये झाला. प्रथम 2010 ते 2012, नंतर 2012 ते 2014, 2019 मध्ये सुरुवातीला केवळ दोन दिवसांसाठी नंतर 2019 ते 2022, 2023 ते 2024 आणि शेवटी 2024 च्या विधानसभा निवडणुकांनंतर ते उपमुख्यमंत्री झाले होते. अजित पवार यांनी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकारांमध्ये हे पद भूषवले होते. त्यांचा हा विक्रम महाराष्ट्राच्या राजकारणात अद्वितीय आहे, ज्यामुळे ते राज्याचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले नेते ठरले.
हे ही वाचा>> 'पार्थ पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला येऊ नये', भाजपकडून स्पष्ट संदेश.. बारामतीलाच का थांबले पार्थ पवार?
अजित पवार यांचा जन्म 1959 साली झाला असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे पुतणे होते. 1999 मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली. 2023 मध्ये पक्षातील फुटीनंतर त्यांनी स्वतंत्र गट तयार करून महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. जलसंपदा, अर्थ आणि नियोजन विभागांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. मात्र, मुख्यमंत्री पद त्यांना कधीच मिळालं नाही, ज्याबाबत ते नेहमी व्यक्त होत. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळील विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला, ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं वळण मिळालं आहे.
सुनेत्रा पवारांचा राजकीय प्रवास आणि ऐतिहासिक शपथ
अजित पवारांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्या बारामती मतदारसंघातून निवडणूक लढल्या होत्या, मात्र तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना पक्षाकडून राज्यसभेवर नामांकित करण्यात आलं होतं. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या विधिमंडळ गटाने त्यांना पक्षनेते म्हणून निवडलं आहे. आजच्या शपथविधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. हा सोहळा मर्यादित स्वरूपात पार पडला, ज्यात कुटुंबीय आणि पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.










