'पार्थ पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला येऊ नये', भाजपकडून स्पष्ट संदेश.. बारामतीलाच का थांबले पार्थ पवार?
दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पण या शपथविधी सोहळ्याला त्यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार नको अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
ADVERTISEMENT

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या वादळाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज (31 जानेवारी) दुपारी 5 वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असा स्पष्ट संदेश भारतीय जनता पक्षाकडून (BJP) देण्यात आला आहे. यामागे पार्थ पवारांवरील पुण्यातील भूखंड प्रकरणातील सुरू असलेली चौकशी आणि संबंधित समितीचा अहवाल आहे.
याच प्रकरणामुळे पार्थ पवार स्टेजवर आल्यास भाजपच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पार्थ पवारांना या कार्यक्रमापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचं समजतं आहे. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तयारी मुंबईतील राजभवनात जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत सुनेत्रा पवारांना नेते म्हणून निवडण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांच्या भूमिकेवर चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा>> आई घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, मुलगा होणार खासदार? पार्थ पवारांबाबत नेमकं काय घडतंय?
भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवारांना या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असा स्पष्ट मेसेज देण्यात आला होता. यामागे पुण्यातील भूखंड प्रकरणातील चौकशीचा मुद्दा महत्त्वाचा आहे.
काय आहे भूखंड प्रकरण?
पुण्यातील एका सरकारी जमिनीच्या विक्री प्रकरणात पार्थ पवारांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीचा संबंध आहे. या जमिनीची बाजारभाव 1804 कोटी रुपये असताना ती केवळ 300 कोटी रुपयांना विकली गेली. ही जमीन 'महार वतन' प्रकारची असून या व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात शीतल तेजवानी या महिलेला अटक केली होती. ज्या या जमिनीच्या पॉवर ऑफ अॅटर्नी होत्या. तसेच, निलंबित उपनिबंधक रवींद्र तरू यांनाही अटक झाली आहे. दरम्यान, या जमीन व्यवहारात पार्थ पवार यांचं नाव प्रामख्याने समोर आलं होतं. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पार्थ पवार यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, असं असलं तरीही या प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल आलेला नाही.










