Saudi Arabia Bus Accident : मक्का येथून मदीनाकडे जात असलेली एक प्रवासी बस सोमवारी (17 नोव्हेंबर 2025) डिझेल टँकरला धडकली. या भीषण अपघातात 42 भारतीयांचा मृत्यूची माहिती समोर आली आहे. भारतीय वेळेनुसार हा अपघात रात्री सुमारे 1:30 वाजता मुफ़रीहाट नावाच्या ठिकाणी झाला. बसमधील सर्व प्रवासी हैदराबादचे रहिवासी असल्याचे सांगितले जात असून त्यामध्ये महिला, मुले आणि पुरुषांचा समावेश होता. अपघाताच्या वेळी अनेक प्रवासी झोपेत होते आणि त्यांना काहीच कल्पना झाली नाही. उमराची पूर्तता करून सर्वजण मदीनाकडे जात होते, जिथे ते जियारतसाठी पोहोचण्याच्या तयारीत होते. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अद्यापही मृतांची अचूक संख्या आणि बचावलेल्या लोकांची माहिती मिळालेली नाही. मात्र, बचावकार्य सुरू आहे.
ADVERTISEMENT
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी व्यक्त केलं दुःख
या दुर्घटनेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. राज्यातील मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि सौदी दूतावासाशी समन्वय साधण्यास सांगितले आहे. याशिवाय राज्य सरकारने प्रभावित कुटुंबांना मदत मिळावी यासाठी सचिवालयात एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) उभारला आहे. येथे लोक आपल्या नातेवाईकांबद्दल माहिती मिळवू शकतात आणि मदत मागू शकतात. सरकारने तत्काळ सहायतासाठी दोन हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत.
हेही वाचा : मला मारण्यासाठी चप्पल उचलली, शिव्या दिल्या, मला अनाथ केलं गेलंय, लालू यादवांच्या कन्येची खळबळजनक पोस्ट
मदतीसाठी केंद्राशी संपर्क
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि सौदी दूतावासातील अधिकाऱ्यांशी बोलून परिस्थिती हाताळण्यास आणि पीडित कुटुंबांना सर्वप्रकारची मदत उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. त्यांच्या निर्देशानुसार मुख्य सचिव रामकृष्ण राव यांनी दिल्लीतील समन्वय अधिकारी गौरव उप्पल यांच्याशी संपर्क साधून माहिती गोळा करणे सुरू केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











