पुणे: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे अढळ आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे खरे नेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे आज (8 डिसेंबर) पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 दिवसांपासून ते आयसीयूत (ICU) उपचार घेत होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक कार्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
मागील बारा दिवसापासून पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांना दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. मात्र आज आठ वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झालं.
दरम्यान, उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे बाबा आढाव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शरद पवारांसह दिग्गज नेत्यांकडून श्रद्धांजली
बाबा आढावांची प्रकृती ही मागील काही दिवसांपासूनच चिंताजनक होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (SP)चे अध्यक्ष शरद पवार यांनी 6 डिसेंबरला रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, आज निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर शरद पवारांनी सोशल मीडियावरून बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुणे जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. फक्त ३ महिन्यांचे असताना वडिलांचे निधन झाले आणि आई बाबूताई पांडुरंग आढाव यांनी त्यांना आणि चार भावंडांना सांभाळले. शिक्षण घेताना त्यांना संघर्ष सहन करावा लागला, पण त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि नंतर समाजवादी चळवळीत पदार्पण केले. राष्ट्र सेवा दलात भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, बापू काळदाते यांसारख्या नेत्यांसोबत काम करत त्यांनी समाजवाद आणि विज्ञाननिष्ठ समाजाच्या प्रस्थापनेसाठी वचनबद्ध झाले.
डॉ. आढाव यांच्या आयुष्यात अनेक ऐतिहासिक लढाया आहेत. त्यांनी दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, अल्पसंख्याक, हमाल, अपंग, धरणग्रस्त यांसारख्या उपेक्षित घटकांसाठी आयुष्य वेचले. एक गाव एक पाणवठा चळवळीमध्ये दुष्काळग्रस्त भागात पाण्याच्या समान वाटपासाठी ही क्रांतिकारी चळवळ राबवली. यामुळे शेकडो गावांमध्ये पाणवठे बांधले गेले आणि शासनाने पाणी धोरणात बदल केले.
ADVERTISEMENT











