बीड / रोहिदास हातागळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने आज (दि.5) एक महत्त्वपूर्ण राजकीय नियुक्ती जाहीर केली आहे. बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून कामाचा अनुभव असलेल्या राजसाहेब देशमुख यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज त्यांना या निवडीचे अधिकृत पत्र देण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांवर आणि पक्षातील त्यांच्या आजवरच्या योगदानावर विश्वास ठेवून ही नवी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.
ADVERTISEMENT
राजेसाहेब देशमुख यांची राजकीय पार्श्वभूमी
राजसाहेब देशमुख हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील एक परिचित नाव आहे. त्यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक देखील लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीत त्यांनी परळीतील मुलांची लग्न लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, पराभव झाल्यानंतर त्यांनी धनंजय मुंडेंवर मतदारसंघात दहशत निर्माण करुन बोगस मतदान करुन घेतल्याचाही आरोप केला होता. राजेसाहेब देशमुख यांनी यापूर्वी बीड जिल्हा परिषदेत शिक्षण व आरोग्य सभापतीपदाची जबाबदारी संभाळली होती. काँग्रेसच्या रजनी पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून राजेसाहेब देशमुख ओळखले जातात. शरद पवारांनी धनंजय मुंडेंविरोधात त्यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र, त्यांचा दारुण पराभव झाला होता.
राष्ट्रवादीच्या नियुक्तीपत्रात काय म्हटलंय?
या नियुक्तीपत्राद्वारे पक्षाने राजसाहेब देशमुख यांच्याकडून स्पष्ट अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. "पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वशक्तीनिशी योगदान द्याल," असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, "समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी" त्यांनी प्रयत्नशील राहावे, असेही पत्रात नमूद केले आहे. या नियुक्तीमुळे मराठवाड्यात, विशेषतः बीड जिल्ह्यात पक्षाला बळ देण्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बार्शी हादरली, स्टोलने गळा आवळला, शरीरावर 17 वार केले; अनैतिक संबंधातून विवाहितेला क्रूरपणे संपवलं
ADVERTISEMENT











