तीन महिन्यापूर्वी IT जॉबसाठी पुण्यात शिफ्ट झालेल्या तरुणासोबत काय घडलं?

मुंबई तक

• 08:28 AM • 17 Oct 2026

पुण्यातील 22 वर्षीय आयटी इंजिनिअर शिखर सक्सेना याच्या मृत्यू प्रकरणात सायबर फसवणुकीचा संशय व्यक्त केला जात आहे. शिखरने सुमारे तीन महिन्यांपूर्वी पुण्यातील एका कंपनीत नोकरी सुरू केली होती. 1 ऑक्टोबर रोजी शहरातील एका उंच इमारतीवरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

Pune IT Engineer Suicide Case

Pune IT Engineer Suicide Case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रसिद्ध IT कंपनीतील तरुणाची आत्महत्या

point

नेमकं कारण काय?

Pune IT Engineer Suicide Case : पुण्यातील एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत नोकरीला लागलेल्या 22 वर्षीय उत्तराखंडच्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मूळचा उत्तराखंडचा असलेला हा तरुण अवघ्या तीन महिन्यांपूर्वी नोकरीनिमित्त पुण्यात शिफ्ट झाला होता. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच, अचानक एका दिवशी त्याचा फोन लागणे बंद झाले. यामुळे उत्तराखंडवरून आलेल्या पालकांनी पुण्यात राहणाऱ्या त्याच्या मामाशी संपर्क साधून पीजीवर पाहण्यास सांगितले, जिथे रूमला कुलूप असल्याचे व तरुण आदल्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता बाहेर पडल्याचे समजले. यानंतर घाबरलेल्या पालकांनी आणि मामाने खराडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली, परंतु काही तासांतच एका इमारतीखाली त्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला.

हे वाचलं का?

मृत्यूपूर्वी आईवडिलांना संशयास्पद कॉल्स

या संपूर्ण प्रकरणास गंभीर वळण मिळाले ते मृत्यूपूर्वी पालकांना आलेल्या काही संशयास्पद फोन कॉल्समुळे. मुलाचा फोन बंद असताना एका व्यक्तीने त्याच्या आईच्या फोनवर फोन करून उद्धटपणे विचारणा केली आणि ट्रू कॉलरवर त्याचे नाव 'अजय कुमार भाटिया' असे दिसून आले. संबंधित व्यक्तीने सुरुवातीला आपण 'पब्जी' गेम खेळताना मित्र झाल्याचे सांगितले, तर नंतरच्या कॉलमध्ये आपण हरियाणाच्या गुडगाव सेक्टर 29 मधील 'सब इन्सपेक्टर' असल्याचे भासवले. इतकेच नव्हे तर, तो तरुण पुण्यात मुलींना 'ड्रग्स' पुरवत असल्याचा व तस्करी करत असल्याचा गंभीर आरोप करून त्याने पालकांमध्ये भीती निर्माण केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा प्रकार 'सायबर फ्रॉड' किंवा खंडणी उकळण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला दबाव असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील वातावरण फिरलं, पुन्हा पाऊस घालणार धिंगाणा?

लॅपटॉपमधून धक्कादायक खुलासे

मुलगा मृत पावल्यानंतर पालकांनी त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलची पाहणी केली असता धक्कादायक खुलासे झाले. लॅपटॉपमधील 'स्क्रीनशॉट्स' आणि 'व्हॉट्सॲप चॅट्स' तपासादरम्यान तरुणाने वेगवेगळ्या अकाऊंट्सवर 'यूपीआय (UPI)' द्वारे पैसे पाठवल्याचे उघडकीस आले, ज्याचे चॅट्स आणि व्यवहारांचे पुरावे 'अजय कुमार भाटिया' या नावाने वापरल्या गेलेल्या नंबरवर पाठवण्यात आले होते. या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच आपल्या मुलाने 'आत्महत्या' केल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात 'बीएनएस 108' (आत्महत्येस प्रवृत्त करणे - Abetment of Suicide) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या अज्ञात व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.

हे ही वाचा : Personal Finance: नोकरी बदलताना जुन्या कंपनीकडून तुमचे किती पैसे अडकून राहू शकतात?

मोबाईल अजूनही लॉक

सध्या पुणे पोलिसांच्या 'तपास पथकाकडून' या प्रकरणाच्या सर्व तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात आहे. मृत तरुणाचा 'मोबाइल' अजून 'अनलॉक' झालेला नसून, पोलिसांकडून 'अल्फाबेट पासवर्ड' क्रॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ट्रू कॉलरवरील नावे आणि कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे तो व्यक्ती खरोखरच पोलिसात कार्यरत आहे की सायबर गुन्हेगार आहे, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका 'ऑनलाइन गेमिंग' आणि 'ड्रग ट्रॅफिकिंग'च्या संशयास्पद जाळ्यात अडकवून एका तरुण आयटी अभियंत्याला कशा पद्धतीने संपवण्यात आले, यामागचे सत्य शोधण्यासाठी पोलीस कसून 'तपास' करत आहेत.