सावंतवाडीतील ओवळीये जंगल परिसरात रानडुक्कराच्या शिकार मोहिमेदरम्यान घडलेल्या एका गंभीर चुकीमुळे 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली. चुकीच्या अंदाजातून झाडलेल्या गोळीने तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन तपासाची दिशा वेगाने पुढे नेली आहे. ही घटना आज सकाळी सुमारे 9.30 च्या सुमारास घडली. मृत्यू झालेला युवक सचिन सुभाष मर्गज (वय 28, रा. वेर्ले – मूळ सांगेली) हा वेल्डिंगचे काम करणारा होता आणि काही दिवसांपूर्वी तो नातेवाईकांकडे गेला होता. तर गोळी झाडल्याचा संशय असलेला सिप्रियान डॉन्टस (वय 45, रा. कोलगाव) हा देखील या मोहिमेत सोबत होता. दोघांबरोबर त्यांच्या काही ओळखीचे आणखी काही मित्रही जंगलात गेले होते.
ADVERTISEMENT
प्राथमिक माहितीनुसार, ही टोळी रानडुक्कराच्या शिकारीसाठी ओवळीये जंगलात दाखल झाली होती. सिप्रियान डॉन्टस हा डबल बॅरल बंदूक घेऊन आला होता. तो आधी कोलगावहून सांगेली येथे आला आणि तिथून सचिनला घेऊन जंगलाच्या दिशेने रवाना झाला, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
हेही वाचा : "आधी अपहरण, बलात्कार अन् नंतर हत्या..." नर्सिंगच्या विद्यार्थीनीसोबत नेमकं काय घडलं?
शिकार करताना सचिन मर्गज याला रान उठवण्याची जबाबदारी होती. तो झाडाझुडपातून पुढे सरकून शिकार लक्ष्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळेत सिप्रियान डॉन्टस एका ठिकाणी दबा धरून बसला होता. झुडपात हालचाल झाल्याने आणि समोर काहीतरी प्राणी आल्याचा भास झाल्याने त्याने क्षणाचाही विलंब न लावता बंदुकीची ट्रिगर दाबल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र गोळी सरळ सचिनच्या दिशेने लागली. त्याच्या हनुवटीवरून छातीच्या उजव्या बाजूला घाव बसला आणि तो कोसळताच जागीच मरण पावला. घटनेनंतर इतर सहकाऱ्यांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हा तो मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सिप्रियान डॉन्टसला ताब्यात घेतले आहे. बंदुकीचा पंचनामा, घटना कशी घडली यावरील सर्वदृष्टी तपास तसेच शस्त्र परवान्याबाबतची चौकशी सुरू आहे. हा अपघात की निष्काळजीपणातून घडलेली चूक, याबाबत पुढील चौकशीतून चित्र स्पष्ट होणार आहे. जंगलातील अवैध शिकार, त्यातही विनापरवाना शस्त्र घेऊन जाण्याच्या घटनांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. एका चुकलेल्या अंदाजामुळे तरुणाचे आयुष्य संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











