SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) शिकाऊ उमेदवारांसाठी (Apprentices) तब्बल 7,150 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाणार असून, यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठीही जागा राखीव आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 1 वर्षाच्या प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षणादरम्यान प्रतिमहिना 15,000 रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाईल. या प्रशिक्षणादरम्यान इतर कोणतेही भत्ते किंवा आर्थिक लाभ देय असणार नाहीत.
ADVERTISEMENT
NAPS पोर्टलवर नोंदणी अनिवार्य
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 19 मे 2026 पासून सुरू झाली असून, ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत 8 जून 2026 पर्यंत आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी 'NAPS' पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून, त्यानंतरच बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. या भरतीसाठीची ऑनलाईन लेखी परीक्षा जुलै 2026 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात नियोजित करण्यात आली असून, परीक्षा प्रवेशपत्र जून 2026 मध्ये उपलब्ध करून दिले जाईल. लेखी परीक्षेच्या निकालानंतर स्थानिक भाषा चाचणी आणि वैद्यकीय तपासणीची तारीख स्वतंत्रपणे घोषित केली जाईल.
हे ही वाचा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांना अटक, फेसबुकवरुन दिली माहिती, कारण काय?
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रतेचा विचार केला असता, 1 एप्रिल 2026 पर्यंत उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या वयाची गणना देखील 1 एप्रिल 2026 याच दिनांकावर आधारित केली जाईल. जनरल प्रवर्गासाठी वयोमर्यादा 20 ते 28 वर्षांची आहे. तर ओबीसी प्रवर्गासाठी 3 आणि SC,ST प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी केवळ भारतीय नागरिकच अर्ज करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, ज्या उमेदवारांनी यापूर्वी स्टेट बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेत शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) म्हणून काम केले आहे किंवा जे सध्या प्रशिक्षण घेत आहेत, ते या भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. तसेच पदवीनंतर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ कामाचा अथवा प्रशिक्षणाचा अनुभव असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार नाहीत.
हे ही वाचा : डॉक्टरांनी लेकासाठी मोटेगावकरांकडून पेपर विकत घेतला, CBI ने आवळल्या मुसक्या
सिबिल स्कोअरची अट काय?
पात्रतेच्या इतर निकषांमध्ये उमेदवाराचा 'सिबिल' (CIBIL) स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे; म्हणजेच बँक, एनबीएफसी किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज अथवा क्रेडिट कार्डची थकबाकी असल्यास आणि ती भरलेली नसल्यास उमेदवार अपात्र ठरतील. याशिवाय, ईशान्येकडील राज्यांतील उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांना करार स्वाक्षरीच्या वेळी ओळख पडताळणीसाठी त्यांचा आवश्यक आयडी क्रमांक सादर करावा लागेल. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.sbi.co.in/careers या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
ADVERTISEMENT











