भिवंडी : तालुक्यातील चावेभरे गावात घडलेल्या एका भयानक घटनेने परिसर हादरला आहे. शेतावर गेलेल्या 65 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या अमानुष प्रकारामुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतावर गेली होती. मात्र, बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी शेतावर धाव घेतली असता, महिलेला निपचित अवस्थेत पडलेली पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोक्यावर गंभीर मारहाण झाल्याचे आणि शरीरावर अत्याचाराचे स्पष्ट व्रण दिसत होते.
कुटुबियांनी तात्काळ गणेशपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात पाठविला. प्राथमिक तपासात महिलेला आधी अत्याचार करून नंतर दगडाने ठेचल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिलेच्या अंगावरचे दागिने चोरीला गेले नाहीत
विशेष म्हणजे, महिलेच्या गळ्यात सुमारे पाच ते सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असून, हे दागिने चोरीला गेलेले नाहीत. त्यामुळे ही हत्या केवळ चोरीसाठी नसून दुसऱ्या कोणत्या कारणासाठी केली गेली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनास्थळाजवळील नागरिकांनी पोलिसांना सांगितले की, घटनेनंतर तीन संशयित व्यक्ती त्या परिसरातून घाईगडबडीत पळताना दिसल्या. यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, त्या तिघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेमुळे चावेभरे आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या निर्घृण हत्येमुळे स्थानिक समाजात संतापाची लाट उसळली असून, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. गावातील नागरिक आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची जलद गतीने चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











