Crime News: राजस्थानमधील बालोतारा येथे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडल्याची बातमी कळताच परिसरात खळबळ उडाली. मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी आसाडा रस्त्यावर झुडपे टाकून महामार्गावर कोंडी केली. परिस्थिती बिघडत चालल्याचं पाहताच घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला.
ADVERTISEMENT
कुटुंबियांचा आरोप...
ही घटना 15 ऑगस्टच्या रात्री घडल्याचं सांगितलं जात आहे. त्या दिवशीच झालेल्या एका कार अपघातात तीन जण जखमी झाले होते. मुलीच्या मृत्यूमागेच कार अपघातच कारणीभूत असल्याचा कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे. याच कारमुळे मुलीला धडक बसली आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर, त्यात जखमी झालेल्या लोकांनी सत्य लपवलं आणि मुलीला गंभीर अवस्थेत वेदनेने तडफडत तिथेच सोडून दिलं, असाही आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी जखमींना रुग्णालयात नेले असता मुलीबद्दल मात्र काहीच माहिती देण्यात आली नसल्याचं देखील कुटुंबियांनी सांगितलं.
संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी मुलीचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यांना काहीच सुगावा न लागल्यास अखेर वैतागून कुटुंबियांनी जसोल पोलिस ठाण्यात बेपत्ता मुलीची तक्रार दाखल केली. पण तीन दिवसांपर्यंत पोलिसांना देखील कोणताही सुगावा लागला नाही. अखेर मृतदेह सापडल्यानंतर सत्य उघडकीस आलं. सत्य लपवण्याचा आणि पोलिसांना दिशाभूल करण्याचा आरोप असल्याने कुटुंबातील सदस्यांचा आणि ग्रामस्थांचा संताप आणखी वाढला
“मुलीबद्दलची माहिती लपवत राहिले”
कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर त्यांची मुलगी जखमी अवस्थेत तिथेच पडली होती. जखमींना रुग्णालयात नेणारे लोक सुद्धा मुलीला पाहून माणुसकी दाखवू शकले नाहीत आणि ते मुलीबद्दलची माहिती लपवत राहिले. जर वेळेवर माहिती दिली असती तर कदाचित त्यांच्या मुलीला वाचवता आलं असतं, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मेट्रो-3 ते महाराष्ट्र विधानभवनचा प्रवास होणार सुकर..कसं ते एका क्लिकवर जाणून घ्या
रस्ता रोखून न्यायाची मागणी
संबंधित मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी तो रस्ता रोखून न्यायाची मागणी केली. त्यावेळी जसोल पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीच्या कुटुंबियांना समजावण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता सीओ बालोतरा आणि आमदार डॉ. अरुण चौधरी यांनीही घटनास्थळी पोहोचून कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. मात्र, संतप्त कुटुंबातील सदस्य त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिले.
हे ही वाचा: Dahi Handi 2025: पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजे मुक्त दहिहंडीचा थरार
या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा आणि संतापाची लाट पसरली आहे. गावकऱ्यांचे म्हणणं आहे की जर मुलीला वेळीच मदत मिळाली असती तर तिचा जीव वाचू शकला असता. प्रशासन आता परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु न्यायाच्या मागणीवर ठाम असलेले कुटुंबीय आता ठोस कारवाईची आशा बाळगून आहेत.
ADVERTISEMENT
