मोडलेल्या पायाऐवजी डॉक्टरांनी केलं भलतंच ऑपरेशन, महिलेचा गेला जीव.. असं घडलं तरी काय?

मुंबई तक

• 04:41 PM • 27 Jul 2026

Viral News: रस्ते अपघातात पाय मोडल्यानंतर दाखल झालेल्या एका महिलेवर तिच्या कुटुंबीयांच्या संमतीशिवाय हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पण उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. पानिपतमधील एका रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे.

woman dies after doctor performs heart surgery instead of treating broken leg uproar ensues

उपचारादरम्यान महिलेचा गेला जीव (फोटो सौजन्य: ITG)

Google CTA

पानिपत: एका महिला रस्ते अपघातात जखमी झाली होती. तिच्या पायाला गंभीर दुखापत होऊन हाड मोडलं होतं. ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण तिच्या पायावर उपचार करण्याऐवजी तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यामध्ये तिचा जीव गेल्याचा धक्कादायक आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही विचित्र घटना हरिणायातील पानिपतमध्ये घडली आहे. 

हे वाचलं का?

मृत महिलेच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत माहिती देताना असा दावा केला आहे की, रस्ते अपघातात जखमी झालेल्या महिलेला केवळ पायाच्या हाडाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांना कोणतीही माहिती न देता किंवा संमती न घेता तिच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी तिच्या हृदयात स्टेंट टाकण्यात आला पण उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबीयांनी असाही दावा केलाय की, संमतीपत्रावर बनावट सहीसुद्धा करण्यात आली होती.  

नेमकी घटना काय?

ही घटना पानिपत शहरातील जीटी रोडवरील पार्क हॉस्पिटलमध्ये घडली. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथील काशीपूर गावचा रहिवासी असलेला कुलदीप, सध्या पानिपतमधील रमेश नगर येथे आपल्या कुटुंबासह राहत आहे. कुलदीपने सांगितले की, 24 जुलै रोजी झालेल्या एका रस्ते अपघातात त्याची आई, गुड्डी देवी ही जखमी झाली. अपघातात तिचा पाय मोडला होता. उपचारासाठी तिला जीटी रोडवरील पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी त्यांना आश्वासन दिले होते की, तिच्या पायावर उपचार केले जातील आणि ती लवकरच बरी होऊन घरी परत येईल.

हे ही वाचा>> तीन सख्ख्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह, पण कोणी घेतला आक्षेप?

पायावर उपचार करण्याऐवजी केली हृदयाची शस्त्रक्रिया

तक्रारीतील सर्वात गंभीर आरोप असा आहे की, 25 जुलै रोजी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी कुटुंबाला माहिती न देता महिलेच्या हृदयावर अँजिओप्लास्टी केली आणि स्टेंट टाकला. कुटुंबाचा दावा आहे की, त्यांना या प्रक्रियेबद्दल माहिती दिली गेली नाही किंवा त्यांची लेखी संमतीही घेण्यात आली नाही. त्यांचा असाही आरोप आहे की, हॉस्पिटलने संमतीपत्रावर त्यांच्या सह्या बनावट केल्या. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, या कथित अनावश्यक वैद्यकीय प्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलगा कुलदीप म्हणतो की, पायाच्या दुखापतीवर उपचार करत असताना हृदयाची शस्त्रक्रिया का करण्यात आली, हे त्याला अजूनही कळलेले नाही.

कुलदीपचा आरोप आहे की, रुग्णालयाने संमतीपत्रावर कुटुंबाच्या सह्यासुद्धा बनावट केल्या. तो म्हणतो की, 'जर डॉक्टरांना खरोखरच हृदयाची गंभीर समस्या आढळली होती, तर त्यांनी कुटुंबाला विश्वासात घ्यायला हवे होते, पण तसे केले गेले नाही. महिलेच्या मृत्यूनंतर त्यांना संपूर्ण प्रक्रियेबद्दल कळले.' असा कुटुंबाचा दावा आहे.

रुग्णालयावर धमकावल्याचाही आरोप

कुटुंबाने रुग्णालय प्रशासनावर केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर दबाव टाकल्याचाही आरोप केला आहे. तक्रारीनुसार, जेव्हा कुटुंबाने उपचार आणि शस्त्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित केले, तेव्हा रुग्णालय व्यवस्थापनाने आपली चूक मान्य करण्याऐवजी, "तुम्हाला जे करायचे आहे ते करा, त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही," असे म्हटले.

हे ही वाचा>> आपल्या तरुणांकडे टॅलेंटची कमी नाही, 26 वर्षीय सिद्धार्थने 1 दिवसात कसे कमावले 77 कोटी?

डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, सेक्टर-29 पोलीस ठाण्यात तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएचओ (SHO) यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 106, 318(4) आणि 351(2) अंतर्गत डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, सर्व आरोपांची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल आणि निष्कर्षांनुसार पुढील कारवाई केली जाईल. 

पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तपास अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. वैद्यकीय नोंदी, शस्त्रक्रियेची कागदपत्रे, संमतीपत्रे आणि रुग्णालयाची संपूर्ण उपचार प्रक्रिया यांचीही तपासणी केली जाईल. गरज भासल्यास, वैद्यकीय मंडळाचे मतही घेतले जाऊ शकते.

रुग्णालयाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा

या प्रकरणी पार्क हॉस्पिटलच्या सीईओ सपना यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी कुटुंबीयांच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी काही वेळ मागितला आहे.

चौकशीनंतरच स्पष्ट होईल चित्र

हे प्रकरण गंभीर मानले जात आहे, कारण यामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा, बनावट सह्या, संमतीशिवाय वैद्यकीय प्रक्रिया आणि मृत्यू यांसारखे अनेक गंभीर आरोप आहेत. पण, तपास पूर्ण झाल्यावरच या सर्व आरोपांची पुष्टी होऊ शकते. सध्या, पोलीस वैद्यकीय नोंदी आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. जर कुटुंबीयांचे आरोप खरे ठरले, तर डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. याशिवाय, रुग्णालयाकडून कोणतेही वैद्यकीय कारण किंवा स्पष्टीकरण दिल्यास, त्याचाही तपासात समावेश केला जाईल. सध्या सर्वांचे लक्ष पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालावर केंद्रित आहे.