लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरले, अन् समोरून आलेल्या टँकरने चिरडलं, 6 जणांचा मृत्यू

Yamuna Expressway bus accident : घटनेची माहिती मिळताच पोलिस, एक्सप्रेसवेची मदत व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी 6 जणांना मृत घोषित केले. एका जखमी व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये चार जण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले असून या घटनेने त्यांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Yamuna Expressway bus accident

Yamuna Expressway bus accident

मुंबई तक

08 Feb 2026 (अपडेटेड: 08 Feb 2026, 11:07 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरले

point

अन् समोरून आलेल्या टँकरने चिरडलं, 6 जणांचा मृत्यू

Yamuna Expressway bus accident : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील यमुना एक्सप्रेसवेवर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. सुरीर कोतवाली हद्दीतील माईलस्टोन क्रमांक 88 जवळ हा अपघात झाला. लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांना भरधाव वेगाने आलेल्या टँकरने चिरडल्याने ही हृदयद्रावक घटना घडली.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून कानपूर देहातकडे जाणारी खासगी बस यमुना एक्सप्रेसवेवरून प्रवास करत होती. माईलस्टोन 88 जवळ काही वेळासाठी बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली. बस थांबताच त्यातील काही प्रवासी लघुशंकेसाठी खाली उतरले. प्रवासी रस्त्याच्या कडेला उभे असतानाच समोरून अतिवेगाने येणाऱ्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अनेक जण हवेत उडून दूर फेकले गेले. काही प्रवासी जागीच कोसळले, तर काही गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून राहिले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. प्रवाशांच्या किंकाळ्या, मदतीसाठीचे आक्रोश आणि भीतीचे वातावरण पसरले. या अपघातामुळे काही काळ यमुना एक्सप्रेसवेवरील वाहतूकही विस्कळीत झाली.

हेही वाचा : अजित पवार यांच्या जागी आमदार कोण? बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कधी लागणार? तयारी सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलिस, एक्सप्रेसवेची मदत व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी 6 जणांना मृत घोषित केले. एका जखमी व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये चार जण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले असून या घटनेने त्यांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातानंतर जिल्हाधिकारी सी. पी. सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक तपासात हा अपघात टँकर चालकाने बेदरकारपणे वाहन चालवल्याने आणि त्याच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संबंधित टँकर ताब्यात घेतला असून चालकाची ओळख पटवून त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्रशासनाकडून जखमीवर योग्य उपचार केले जात असून मृतांच्या नातेवाइकांना नियमानुसार आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेचा सखोल तपास सुरू असून यमुना एक्सप्रेसवेवरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

प्रियकराचं दुसरीकडे लग्न ठरलं म्हणून अंगावर थेट ॲसिड ओतलं! तरुणाच्या मृत्यूनंतर प्रेयसीला जन्मठेप अन्...

    follow whatsapp