army man murdered his wife: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आलीये. गीता यादव यांच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी पती भारत सिंह यादव याच्यानंतर आता त्याच्या प्रेयसीलाही अटक करून तिची रवानगी तुरुंगात केली आहे. ही घटना सुभाषनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 एप्रिल रोजी उघडकीस आली होती. मृत गीता यादव यांचा पती भारत सिंह यादव हा भारतीय सैन्यात कार्यरत असून सुरुवातीच्या तपासातच पोलिसांची संशयाची सुई त्याच्याकडे वळली होती. तपासात असे स्पष्ट झाले की, भारत सिंहनेच आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली होती आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. काही दिवसांनी त्याने न्यायालयात शरणागती पत्करली, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून सखोल चौकशी सुरू केली असता यामागील प्रेमप्रकरणाचे धक्कादायक वास्तव समोर आले.
ADVERTISEMENT
पाच वर्षांचे प्रेमप्रकरण आणि हत्येचा कट; फेसबुकवरून झाली होती ओळख
आरोपी भारत सिंह यादव याने चौकशीदरम्यान कबूल केले की, सुमारे पाच वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून त्याची ओळख बदायूं जिल्ह्यातील परवेज नगर येथील रहिवासी सुरभि यादव हिच्याशी झाली होती. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि भारत सिंह आपल्या कुटुंबापासून दुरावला गेला. तो चोरून सुरभिची भेट घेत असे आणि सुट्ट्यांमध्ये तिच्यासोबत वेळ घालवू लागला होता; तसेच तो तिला दरमहा 15 हजार रुपये देखील देत असे. जेव्हा पत्नी गीता यादव यांना या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली, तेव्हा घरात सतत वाद होऊ लागले. हा तणाव इतका वाढला की, भारत सिंहने पत्नीला आपल्या आयुष्यातून कायमचे हटवण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी सुरभि यादव हिने देखील भारत सिंहवर पत्नीचा काटा काढण्यासाठी दबाव निर्माण केला होता, ज्यातून 18 एप्रिल रोजी या हत्येचा कट रचण्यात आला.
पहाटे गळा दाबून केली हत्या; सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटले बिंग
रचलेल्या कटानुसार, 21 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास भारत सिंहने बरेली येथील बीडीए कॉलनीतील आपल्या घरात गीता यादव यांची गळा दाबून हत्या केली. ही संपूर्ण घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ज्यामुळे पोलिसांच्या तपासाला एक भक्कम पुरावा मिळाला. हत्येनंतर फरार झालेल्या भारत सिंहने फोनवरून आपल्या प्रेयसीला या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी जेव्हा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि इतर पुराव्यांची तपासणी केली, तेव्हा या गुन्ह्यात सुरभि यादव हिचा असलेला सक्रिय सहभाग स्पष्ट झाला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरभिला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले, तिथून तिची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांकडून कारवाईची पुष्टी; आरोपी प्रेयसीलाही झाली अटक
बरेलीचे एसपी सिटी मानुष पारीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 तारखेला सुभाषनगर पोलीस ठाण्यात या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात महिलेच्या पतीनेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीने न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. आता या कटात सामील असलेल्या त्याच्या प्रेयसीलाही अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने केवळ एका निष्पाप महिलेचा जीव घेतला नाही, तर एका अनैतिक संबंधामुळे सुखी कुटुंब कसे उद्ध्वस्त होऊ शकते आणि माणूस गुन्हेगारीकडे कसा वळतो, याचे विदारक दर्शन घडवले आहे. पोलीस आता या प्रकरणातील सर्व तांत्रिक पुरावे गोळा करून न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र सादर करण्याच्या तयारीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
लग्नाला काही तासच शिल्लक होते, फुलांनी सजलेल्या गाडीतच नवरदेवाला संपवले, कोणी केली हत्या?
ADVERTISEMENT











