Barshi Crime : गेल्या 15 दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. ढगफुटीसदृश्य पावसामुळे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील नागझरी, चांदणी आणि भोगावती या तीन नद्यांना महापूर आलाय. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हेरावून घेतलाय. त्यामुळे आधीच मुलांच्या शैक्षणिक फीसचं टेन्शन असलेल्या शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने फास आवळलाय. बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. लक्ष्मण काशीनाथ गावसाने (वय 45, रा. दहिटणे- बार्शी), शरद भागवत (39, रा. कारी) अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, लक्ष्मण गावसाने शेतीसोबतच मजुरी करुन त्यांचा उदरनिर्वाह करत होते. गावसाने यांचा मुलगी बीएससीचं शिक्षण घेत होती, तर मुलगा इंजिनिअरिंग करत होता. आधीच मुलांच्या फीस देताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यात अतिवृष्टीमुळे शेतातील पीक अक्षरश: काळं पडलं. त्यामुळे शेतकरी असलेल्या लक्ष्मण गावसाने यांनी टोकाचं पाऊल उचलत आयुष्याचा शेवट केलाय. त्यांचा मृतदेह सासुरे येथील शेतात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळलाय.
शिवाय, कारी येथील शरद भागवत यांनी देखील झाडाला गळफास घेत आत्महत्या केलीये. शरद भागवत हे अल्पभूदारक शेतकरी होती. त्यात त्यांनी शेतीसाठी ऊसणे पैसे कर्ज काढून पेरु आणि लिंबाचं बाग फुलवली. मात्र, गेल्या 15 दिवसांत झालेल्या पावसामुळे ही पिकं पूर्णपणे नष्ट झाली. अतिवृष्टीमुळे शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसं फेडणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. त्यामुळे बार्शीतील दोन शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय.
बार्शी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून भोगावती, नागझरी, नीलकंठा आणि चांदणी नद्यांना पूर आला होता. ग्रामीण भागातील अनेक छोट्या नद्यांना महापूर आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पीके पाण्यात गेली आहेत. द्राक्षबागा, सोयाबीन, अशा अनेक शेती पीकांचं नुकसान झालंय. ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्यामुळे सोलापूरसह मराठवाड्यातील अनेक शेतकरी नैराश्यात असल्याचे चित्र आहे.
Solapur flood Live :बार्शीमध्ये ग्रामस्थ आक्रमक, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या शेतात काय घडलं?
ADVERTISEMENT
