Bangalore Foxconn Crime News : बेंगलोर येथील देवनहल्ली भागात असलेल्या फॉक्सकॉन कंपनीत एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या एका अविवाहित महिला कर्मचाऱ्याने आपल्या नवजात बाळाची हत्या करून त्याचा मृतदेह शौचालयातील कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ADVERTISEMENT
महिला शौचालयात आढळले अर्भक
ही घटना फॉक्सकॉनच्या बेंगलोरमधील सर्वात मोठ्या युनिटमध्ये घडली, जिथे सुमारे 25 हजार कर्मचारी काम करतात. कंपनीच्या महिला शौचालयातील कचऱ्याच्या डब्यात एका कर्मचाऱ्याला काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेले नवजात अर्भक अत्यंत विदारक अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केले.
हे ही वाचा : गायकवाडांनी धमक्या दिल्या, अंबींची पोलीस ठाण्यात धाव, सरोदेंमार्फत दाखल केलेली तक्रार जशीच्या तशी
संशयित महिला ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी रेणुका नावाच्या संशयित महिलेला ताब्यात घेतले असून, सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपनीचे अभियंता कांतराजू यांनी या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने भीतीपोटी हे कृत्य केल्याचा संशय असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
हे ही वाचा : नागपूर : 'व्याज दे नाहीतर तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव..' सावकाराची मागणी ऐकून डोक्यात तिडीक, थेट मर्डर
गुन्ह्याची नोंद
विश्वनाथपुरा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 93 आणि 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या औद्योगिक संकुलात घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
ADVERTISEMENT











