Crime News : बंगळुरू येथील एका 23 वर्षीय तरुणीचा हसन जिल्ह्यातील एका लॉजमध्ये अचानक कोसळून गूढ मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी तिने चॉकलेट खाल्ले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. वर्षा असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, ती आपल्या चुलत भावासोबत आणि एका मित्रासोबत 11 सप्टेंबर रोजी सकलेशपूर येथे पर्यटनासाठी आली होती. तिच्या पालकांनाही याची माहिती असल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
बाथरुममध्ये जाताना कोसळली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉजमध्ये रहात असताना तिने अंघोळीला जाण्यापूर्वी वर्षाने एक चॉकलेट खाल्ले होते. त्यानंतर बाथरूमच्या दिशेने जात असताना ती अचानक खाली कोसळली. या घटनेनंतर लॉजमध्ये एकच खळबळ उडाली. तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या दोन्ही सहकाऱ्यांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमधून काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; सरकारला 90 दिवसांची मुदत, 'त्या' 5 मुद्द्यांवर सरकारकडून आश्वासन
नेमका मृत्यू कशामुळे?
हसनच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या पालकांना तिच्या या पर्यटन दौऱ्याबद्दल पूर्ण कल्पना होती. बंगळुरूहून हे ठिकाण सुमारे 190 किलोमीटर अंतरावर आहे. प्राथमिक तपासणीत वर्षाच्या शरीरावर कोणत्याही बाह्य दुखापती किंवा जखमांच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे नेमका मृत्यू कसा झाला हे शोधण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे.
हे ही वाचा : मनोज जरांगेंना सरकारकडून कोणती आश्वासने? पहाटे काय घडलं? आंदोलनाचं काय होणार?
आकस्मिक मृत्यूची नोंद
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या पोलीस वैद्यकीय अहवाल (पोस्ट-मॉर्टम रिपोर्ट) येण्याची वाट पाहत असून, त्यानंतरच तिच्या मृत्यूमागील खरे कारण समोर येऊ शकेल. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे वर्षाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT












