Crime News : पोलिसांच्या कारवाईदरम्यान एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या प्रकरणात गौरव नावाच्या तरुणाला अटक करण्यासाठी रविवारी (13 सप्टेंबर) रात्री 11.45 वाजता पोलीस पथक त्याच्या घरी पोहोचले होते. गौरवची 28 वर्षांची गर्भवती पत्नी अंजली हिने पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करत पतीला सोडण्याची विनंती केली. यावेळी आरोपी सब-इन्स्पेक्टर धर्मपाल सिंग यांनी अंजलीच्या पोटात लाथ मारल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या मारहाणीनंतर अंजली जमिनीवर कोसळली आणि तिची प्रकृती खालावली. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
मुलाला जन्म दिला, पण...
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती बिघडल्याने अंजलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे सोमवारी सकाळी तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर तिची तब्येत अधिकच बिघडल्याने तिला फिरोजाबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अंजलीच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी गौरवची सुटका केली. दरम्यान, जन्मलेल्या नवजात बालकाची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी आग्रा येथे रेफर करण्यात आले आहे.
हे ही वाचा : भेट घेऊन तक्रार केली..,अन् झटक्यात पीएम मोदींच्या वर्गमित्राला जमीन परत मिळाली, नरेंद्र मेहतांचा मोठा निर्णय!
पोलिसांविरोधात निदर्शने
या घटनेची माहिती पसरताच गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर धडक देऊन जोरदार निदर्शने केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फिरोजाबादचे पोलीस अधीक्षक आदित्य लांघे यांनी निष्काळजीपणा आणि गैरवर्तनाचा ठपका ठेवत दोन सब-इन्स्पेक्टरसह सहा पोलिसांना तात्काळ निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सब-इन्स्पेक्टर धर्मपाल सिंग, सत्यपाल सिंग, हेड कॉन्स्टेबल मोहन सिंग, अरविंद कुमार आणि कॉन्स्टेबल भवतोष कुमार, कुलदीप कुमार यांचा समावेश आहे.
हे ही वाचा : ठाकरेंचा 'तो' अधिकार शिंदेंना खुपला, आयोगानेही नाकारला! सुप्रीम कोर्टात मोठा मुद्दा
परिसरात तणावपूर्ण शांतता
अंजलीच्या मृतदेहाचे उशिरा रात्री शवविच्छेदन करून कडेकोट पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून पोलीस तपासाअंतीच अंजलीच्या मृत्यूमागचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT












