विधवा आईवर चेटकीण असल्याचा आरोप, 23 वर्षीय मुलाला संपवले

जमिनीच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाच्या आईला आरोपींनी चेटकीण ठरवण्याचा घाट घातल्याचे तपासात समोर आले आहे. बिहारच्या बेगुसराय परिसरातील ही घटना आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:33 AM • 22 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधवा आईवर चेटकीण असल्याचा आरोप

point

23 वर्षीय मुलाला संपवले

Crime News : बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातून अंधश्रद्धा आणि जमिनीच्या वादातून घडलेली एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विधवा महिलेवर 'डायन' (भानामती किंवा जादूटोणा करणारी) असल्याचा आरोप करत तिच्या 23 वर्षीय मुलाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून जोरदार निदर्शने केली आणि पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली. चंदन कुमार (वय 23) असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांची समजूत काढली, त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

हे वाचलं का?

गळ्यावर आणि छातीवर वार

मिळालेल्या माहितीनुसार, मृत चंदन कुमारचा त्याच्या चुलत भावाशी आणि त्याच्या कुटुंबीयांशी बऱ्याच काळापासून जमिनीचा वाद सुरू होता. गुरुवारी (18 जून) सकाळी चंदनची विधवा आई शेतात गेली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने काळजीपोटी चंदन तिला पाहण्यासाठी शेताकडे गेला. तिथे त्याची आई आणि चुलत भाऊ यांच्यात वाद सुरू असल्याचे त्याला दिसले. चंदनने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासोबतही मारामारी करण्यात आली. त्यावेळी हा वाद शांत झाला आणि चंदन आपल्या घराकडे परत निघाला. मात्र, दबा धरून बसलेल्या चुलत भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी वाटेतच चंदनला गाठले आणि त्याला घेरले. त्यानंतर त्याच्या डोक्यावर, गळ्यावर आणि छातीवर एकामागून एक तब्बल डझनभर वार करण्यात आले, ज्यामुळे गंभीर जखमी होऊन चंदनचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : 6 खासदार फुटल्यानंतर आदित्य ठाकरे संतापले, काय म्हणाले?

पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर...

मृताच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे की, चंदनच्या आईला शेजारी राहणारे नातेवाईक गेल्या अनेक दिवसांपासून 'डायन' म्हणून मानसिक व शारीरिकदृष्ट्या छळत होते. या कारणावरून यापूर्वीही अनेकदा वाद आणि हाणामारी झाली होती. पीडित कुटुंबाने या छळाबाबत यापूर्वीच पोलीस ठाण्यात लेखी तक्रार (अर्ज) दिली होती, मात्र पोलिसांनी त्यावर कोणतीही ठोस किंवा प्रभावी कारवाई केली नाही. जर पोलिसांनी वेळीच दखल घेऊन कारवाई केली असती, तर आज चंदनचा जीव वाचला असता, असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, अंधश्रद्धेचा क्रूर खेळ आणि जुना जमिनीचा वाद या दोन्ही कारणांमुळे हा थरार घडला आहे.

हे ही वाचा : ठाकरेंची साथ सोडल्यानंतर संजय जाधवांची पहिली पोस्ट, फेसबुकचं कमेंट सेक्शन बंद

जमिनीचा वाद की जादूटोणा?

या भीषण हत्याकांडानंतर संपूर्ण गावात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मोठा गोंधळ घातला. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार हे प्रकरण जमिनीच्या वादाशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. धारदार चाकूने वार करून या युवकाची हत्या करण्यात आली असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. कुटुंबीयांनी पोलिसांवर केलेल्या निष्काळजीपणाच्या आरोपावर बोलताना एसपी म्हणाले की, पूर्वी खरोखरच काही तक्रार अर्ज आला होता का, याची सखोल चौकशी केली जाईल आणि त्यानुसार पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा जमिनीचा वाद आणि जादूटोण्याचा आरोप अशा दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.