'नवऱ्याला कोंडलं अन् माझ्यासोबत पाच जणांनी...' पीडितेनं सांगितली हादरवून टाकणारी कहाणी

पाच नराधमांनी एका महिलेचे हात-पाय बांधून, तिच्या शरीरावर ब्लेडने वार करत सामूहिक बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता, या हैवानांनी पीडितेच्या गुप्तांगात बंदुकीची गोळी (काडतूस), दगड आणि लाकडाचे तुकडे कोंबले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:11 AM • 22 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याला कोंडलं अन् माझ्यासोबत पाच जणांनी...

point

पीडितेनं सांगितली हादरवून टाकणारी कहाणी

Crime News : बिहारमधील बेगुसराय येथून माणुसकीला काळीमा फासणारी आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पाच नराधमांनी एका महिलेचे हात-पाय बांधून, तिच्या शरीरावर ब्लेडने वार करत सामूहिक बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता, या हैवानांनी पीडितेच्या गुप्तांगात बंदुकीची गोळी (काडतूस), दगड आणि लाकडाचे तुकडे कोंबले. घटनेच्या सहाव्या दिवशी पीडितेच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने तिला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे अल्ट्रासाऊंड तपासणी केल्यानंतर तिच्या गुप्तांगात काडतूस, दगड आणि लाकूड असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आणि शस्त्रक्रिया करून ते बाहेर काढले. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांच्या दोन डीएसपींच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

सामूहिक बलात्कार, ब्लेडने वार अन्...

ही संतापजनक घटना 11 जून रोजी रात्री घडली. पीडित महिला रात्री साडेअकराच्या सुमारास घराबाहेर असलेल्या शौचालयात गेली होती. त्याच वेळी पाचजणांनी तिच्या नवऱ्याच्या खोलीला बाहेरून कडी लावून कोंडले. महिला शौचालयातून बाहेर येताच नराधमांनी तिला जबरदस्तीने पकडले. तिने आरडाओरडा करू नये म्हणून तिचे तोंड साडीने दाबले आणि ब्लाउज फाडून तिचे हात-पाय बांधले. यानंतर तिला अंधारातच एका निर्जन ठिकाणी नेऊन पाच जणांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने सुटकेसाठी गयावया केली असता, आरोपींनी तिच्या छातीवर आणि मांड्यांवर ब्लेडने सपासप वार करून तिला बेदम मारहाण केली. या अमानुष अत्याचारादरम्यानच आरोपींनी तिच्या गुप्तांगात गोळी, दगड आणि लाकूड कोंबले, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली.

हे ही वाचा : शिक्षिका बँक मॅनेजरसोबत आक्षेपार्ह स्थितीत, 6 वर्षीय मुलानं पाहिलं अन्..

गुप्तांगात असह्य वेदना

घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 जून रोजी सकाळी पीडितेला गंभीर अवस्थेत सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी तिला घरी पाठवण्यात आले. डॉक्टरांनी अंतर्गत जखमांमुळे वेदना होत असल्याचे सांगितले होते. मात्र, घरी गेल्यानंतरही तिच्या पोटातील आणि गुप्तांगातील वेदना असह्य झाल्या. त्यामुळे 17 जून रोजी सकाळी तिला पुन्हा सदर रुग्णालयात आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केले असता तिच्या शरीराच्या अंतर्गत भागात परकीय वस्तू असल्याचे दिसून आले. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या गुप्तांगातून बंदुकीची गोळी, दगड आणि लाकडाचे तुकडे यशस्वीरित्या बाहेर काढले, ज्यामुळे डॉक्टरांनाही धक्का बसला.

हे ही वाचा : 13 वर्षीय मुलाने 9 वर्षीय मुलीला मंदिरामागे नेत नको तेच..

पोलिसांची कारवाईला टाळाटाळ

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पीडितेने पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पीडितेच्या सांगण्यानुसार, घटनेच्या रात्री तिच्या नवऱ्याने लहान जाऊबाईच्या मदतीने खोलीबाहेर पडून पोलिसांना फोन केला होता, तेव्हा पोलिसांनी थेट रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. एका रुग्णालयातून तिला सदर रुग्णालयात पाठवण्यात आले, गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, तीन महिन्यांपूर्वीही याच नराधमांनी तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता आणि मारहाण करून घरातील दागिने व रोकड लुटली होती. त्यावेळीही पोलिसात तक्रार नोंदवूनही पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यामुळेच आरोपींचे मनोधैर्य वाढले आणि त्यांनी पुन्हा हे क्रूर कृत्य केले, असा आरोप पीडितेने केला आहे.

हे ही वाचा : Govt Jobs : पदवीधरांना लाखो रुपये पगार देणार SBI, भरती सुरु, लगेच करा अर्ज

जलदगती न्यायालयात सुनावणी

हे भीषण प्रकरण उघडकीस येताच पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षकांच्या (SP) आदेशानंतर सदरचे डीएसपी-1 आनंद कुमार पांडे, डीएसपी-2 दुर्गा कुमारी आणि महिला पोलीस अधिकारी तातडीने रुग्णालयात पोहोचले. त्यांनी पीडितेचा पुनश्च जबाब नोंदवून पुढील कारवाईला वेग दिला आहे. डीएसपी आनंद कुमार पांडे यांनी सांगितले की, पीडितेचा जबाब सत्य वाटत असून तिच्या गुप्तांगातून गोळी आणि इतर वस्तू काढल्याची पुष्टी झाली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात (स्पीडी ट्रायल) चालवले जाईल. तसेच, या प्रकरणात सुरुवातीला पोलीस कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही कडक विभागीय कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.