Cancer patient wife murdered by husband contract killing : उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी हत्या प्रकरण समोर आली आहे. कॅन्सरने पीडित असलेल्या एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या हत्येचा कट स्वतः तिच्या पतीने रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पत्नीच्या हत्येसाठी पतीने सुपारी दिल्याची बाब समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मृत महिलेचा पती राहुल शर्मा याच्यासह त्याचे दोन साथीदार शेरअली उर्फ शेरा आणि फिरोज यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरण्यात आलेले दोन चाकूही जप्त केले आहेत.
ADVERTISEMENT
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बहादुरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मदपूर रुस्तमपूर गावातील आहे. 2 फेब्रुवारीच्या रात्री एका महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला होता. सुरुवातीला ही घटना चोरीदरम्यान झालेली हत्या असल्याचा बनाव करण्यात आला होता. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले गेले होते, त्यामुळे चोरीचा संशय अधिक बळावला. मात्र, पोलीस तपास पुढे गेला आणि घटनेमागचा भयंकर कट उघडकीस आली.
तपासात समोर आलेल्या माहिती नुसार, मृत महिलेचा पती राहुल शर्मा यानेच आपल्या पत्नी रीता शर्मा हिची हत्या करण्याचा कट रचला होता. राहुलने आपल्या दोन कर्मचार्यांना शेरअली उर्फ शेरा आणि फिरोज यांना पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. घरगुती वाद, पत्नीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी होणारा मोठा खर्च आणि आई व पत्नीमधील सततचे भांडण, या सगळ्यामुळे राहुल पत्नीपासून सुटका मिळवू इच्छित होता.
हेही वाचा : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान, पाहा कुठे कुठे पार पडतंय मतदान?
2 फेब्रुवारीच्या रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास राहुलने ‘साडीचे पैसे’ हा कोडवर्ड वापरून आपल्या दोन्ही साथीदारांना घरी बोलावले. याच कोडवर्डद्वारे तिघांमध्ये हत्येची चर्चा होत होती. शेरा आणि फिरोज राहुलच्या घरी पोहोचले. त्या वेळी घरात राहुलची आई देखील होती, मात्र तिला काहीही संशय आला नाही. तिघांनी मिळून आधी रीता हिचे तोंड दाबले आणि त्यानंतर शेरा व फिरोज यांनी दोन चाकूंनी तिच्या गळ्यावर आणि शरीरावर सपासप वार केले. या हल्ल्यात रीता यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर ही घटना चोरीसारखी भासावी यासाठी घरातील सामान इकडे-तिकडे फेकण्यात आले.
घटनेनंतर स्वतःवर संशय येऊ नये म्हणून राहुलने अत्यंत शिताफीने नियोजन केले. तो रात्रीच घरापासून सुमारे 20 किलोमीटर दूर असलेल्या नानई गावात एका लग्न समारंभाला गेला. तेथे त्याने फोटोही काढून घेतले, जेणेकरून त्याच्याकडे पुरावे राहतील. त्यानंतर तो बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर येथील आपल्या दुसऱ्या दुकानात जाऊन झोपला. पहाटे सुमारे चार वाजता तो पुन्हा घरी परतला आणि घरात चोरी झाल्याचा तसेच पत्नीची हत्या झाल्याचा बनाव करत आरडाओरडा केला.
माहिती मिळताच अनेक पोलीस ठाण्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली. श्वान पथक घरासह शेरा आणि फिरोज यांच्या घराजवळही फिरत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी राहुलची कसून चौकशी सुरू केली. त्याने लग्न समारंभात गेल्याची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासले असता अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या. ‘साडीचे पैसे’ या कोडवर्डचाही उलगडा झाला. अखेर सखोल चौकशीत राहुलचा बनाव उघड झाला. त्याने संपूर्ण कटाची कबुली दिली. त्यानंतर शेरा आणि फिरोज यांनाही अटक करण्यात आली. दोघांकडून हत्येसाठी वापरलेले दोन चाकू जप्त करण्यात आले आहेत.
अपर पोलीस अधीक्षक विनीत भटनागर यांनी सांगितले की, राहुल आणि रीता यांचा विवाह 2009 मध्ये झाला होता. त्यांना 18 वर्षांचा एक मुलगा असून तो सध्या आपल्या ननिहाल मेरठ येथे राहतो. राहुल हा अत्यंत शातीर असून पत्नीच्या आजारपणाचा खर्च टाळण्यासाठी आणि घरगुती वादातून सुटका मिळवण्यासाठी त्याने हा भीषण निर्णय घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











