भिवंडी: महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी (TET) परीक्षा पेपर फुटीप्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी सोनू कुमार दिवाकर याने सोमवारी अचानक भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला आज (28 जुलै) कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेनंतर टीईटी पेपर फुटीप्रकरणातील अटक आरोपींची संख्या 15 वर गेली आहे.
ADVERTISEMENT
पेपर फुटीने राज्यभरात उडाली होती खळबळ
टीईटी परीक्षेच्या अवघ्या दोन दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आल्याने महाराष्ट्रासह देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ हद्दीत 26 जून रोजी प्रथम तीन आरोपींना अटक करण्यात आली होते. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली.
हे ही वाचा>> महाराष्ट्र TET पेपरफुटीचा मुख्य आरोपी अटकेत, आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक
मुख्य सूत्रधारासह 15 आरोपी जाळ्यात
या प्रकरणात यापूर्वी 14 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये या रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याचाही समावेश आहे. अटक आरोपींपैकी 12 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून बिजेंद्र गुप्ता आणि इंद्रजीत सिंग उर्फ पिकू हे दोघे सध्या पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यातील महत्त्वाचा आरोपी सोनू कुमार दिवाकर हा पोलिसांना चकवा देत फरार होता. मात्र, मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याला अटक झाल्यानंतर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील, या भीतीने त्याने अखेर भिवंडी न्यायालयात हजर होत आत्मसमर्पण केले.
न्यायालयाचा आदेश; पोलिसांना मिळाला आरोपीचा ताबा
आत्मसमर्पणानंतर न्यायालयाने आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देत या प्रकरणातील तपासाबाबत पोलिसांचे म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सोनू कुमार दिवाकर याला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हे ही वाचा>> TET पेपर लीक प्रकरण : तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार, 1.5 कोटींचा रेट
कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी
आरोपीचे वकील अॅड. शैलेश गायकवाड यांनी सांगितले की, सोनू कुमार हा त्यांचा मित्र असून 2018 पर्यंत दोघे एकत्र काम करत होते. या प्रकरणात त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाले होते का, प्रश्नपत्रिका विक्रीसाठी कोणती मदत करण्यात आली होती का आणि कॉल डिटेल्समध्ये कोणते पुरावे समोर आले आहेत, याच्या आधारे पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
तपास यंत्रणा आता आरोपीच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपींशी असलेल्या संपर्काची माहिती तपासत असून या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT












