Crime News : वैवाहिक आयुष्याबद्दल ज्योतिष्याने वर्तवलेल्या भीतीदायक भविष्यवाणीमुळे एका 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बंगळुरूच्या बागलकुंठे भागातील एमईआय (MEI) लेआउटमध्ये शुक्रवारी घडली असून सोमवारी पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. विद्याज्योती असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याज्योती एका दुसऱ्या जातीतील तरुणाच्या प्रेमात होती. दोघांच्या कुटुंबांनी या लग्नाला संमती दिली होती आणि लग्नाची तयारीही सुरू होती.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्याज्योतीच्या पालकांनी काही दिवसांपूर्वी एका ज्योतिष्याकडे कुंडली दाखवली होती. त्या ज्योतिष्याने असा दावा केला की, लग्नानंतर दोन वर्षांनी पती-पत्नीमध्ये मोठे वाद निर्माण होतील आणि त्यांचे नाते तुटण्याची शक्यता आहे. ही संभाव्य समस्या टाळण्यासाठी ज्योतिष्याने कुटुंबाला नऊ दिवसांचे एक विशेष धार्मिक अनुष्ठान (पूजा) करण्यास सांगितले होते. कुटुंबाने हे अनुष्ठान सुरूही केले होते.
हेही वाचा : रात्री मोबाईलवरून झाला वाद, उडी मारत महिलेनं जीवन संपवल्याचा संशय, अंगणात आढळला मृतदेह
अनुष्ठानाच्या शेवटच्या दिवशीच घडली दुर्घटना
दुर्दैवाने, नऊ दिवसांच्या या पूजेच्या शेवटच्या दिवशी विद्याज्योती तणावाखाली होती. तिचे आई-वडील घराबाहेर असताना तिने आपल्या खोलीत जाऊन सिलिंग फॅनला गळफास लावून घेतला. संध्याकाळी पालकांनी वारंवार दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिचे वडील दरवाजा तोडून आत शिरले. त्यावेळी विद्याज्योती मृतावस्थेत आढळून आली.
पोलीस तपास सुरू
बागलकुंठे पोलिसांनी याप्रकरणी 'आकस्मिक मृत्यू' (UDR) अशी नोंद केली आहे. एका सुशिक्षित तरुणीने केवळ ज्योतिष्याच्या सांगण्यावरून नैराश्यात येऊन असे पाऊल उचलल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बायकोला रील्स बनवण्याचं वेड, वैतागलेल्या नवऱ्यानं गळा आवळून संपवलं; हत्येआधी बनवलेला व्हिडीओ व्हायरल
ADVERTISEMENT











