Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या खोड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिलाईकाम करणाऱ्या 35 वर्षीय अंशुल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 10 ऑक्टोबर रोजी वंदना विहार कॉलनीतील भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उलगडा केला. अंशुल यांची 30 वर्षीय पत्नी निशा आणि तिचा मावस मेहुणा 35 वर्षीय पप्पू उर्फ गंगा भगत यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. अंशुल यांना बाजूला करून लग्न करण्याच्या उद्देशाने ही हत्या केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: कंपनीकडून मिळणारे शेअर्स म्हणजे मोफत संपत्ती की छुपा धोका?
पप्पू गावातून बेकायदा पिस्तूल घेऊन आला अन्..
अंशुल आणि निशा हे मूळचे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील रहिवासी होते. दोघेही नोएडातील एका शिलाई कंपनीत काम करत होते. पप्पू गेल्या दोन वर्षांपासून निशाच्या संपर्कात होता. गेल्या काही महिन्यांपासून तो अंशुल आणि निशा यांच्यासोबत राहत होता. अंशुल यांना दोघांच्या संबंधांची माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबत कुटुंबीयांकडे तक्रारही केली होती. त्यामुळे अंशुल यांना मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यासाठी पप्पू गावातून बेकायदा पिस्तूल घेऊन आला होता. 10 ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याने अंशुल खोलीत एकटे होते. दुपारी ते झोपले असताना पप्पूने त्यांच्या मागून डोक्याला पिस्तूल लावून गोळी झाडली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला आणि त्याने निशाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली.
हेही वाचा : वर्गमैत्रिणीच्या घरी गेला अन् गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, दहावीच्या विद्यार्थ्यासोबत काय घडलं?
आरोपीने पिस्तूल नाल्यात फेकून दिले होते
या प्रकरणात 11 ऑक्टोबर रोजी अंशुल यांच्या बहिणीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यात तिने प्रेमसंबंधांचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर पप्पूने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. अंशुल यांच्या हत्येसाठी वापरलेले बेकायदा पिस्तूल आणि एक रिकामी काडतुसाची पुंगळी पोलिसांनी जप्त केली. आरोपीने पिस्तूल नाल्यात फेकून दिले होते. पोलिसांनी चुंबकाच्या मदतीने ते बाहेर काढले. दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
हत्येनंतर संशय आपल्यावर येऊ नये, यासाठी घरमालकावर आरोप करण्याची योजना आखल्याचाही तपासात उल्लेख आहे. घराचे दहा महिन्यांचे भाडेही दिले नव्हते, जेणेकरून हत्येचा संशय घरमालकावर जावा, असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. घटनेनंतर संध्याकाळी निशा घरी परतली तेव्हा ती मोठ्याने रडत होती आणि घरमालकावर आरोप करत होती. मात्र, पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणातील संशयितांची नावे समोर आली. पप्पू आणि निशा यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे पप्पूने चौकशीत सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. अंशुल यांना या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर ते खोली बदलून वेगळे राहण्याच्या तयारीत होते. त्याआधीच त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT












