Personal Finance: कंपनीकडून मिळणारे शेअर्स म्हणजे मोफत संपत्ती की छुपा धोका?
कंपनीकडून मिळणारे ESOP शेअर्स कर्मचाऱ्यांना भविष्यात मोठी संपत्ती मिळवून देऊ शकतात; मात्र त्यात गुंतवणुकीचा खर्च, कर आणि शेअर्स विकण्याच्या मर्यादा असे धोकेही असतात.
ADVERTISEMENT

Personal Finance tips for Shares: नोकरी करताना पगारासोबत कंपनीकडून शेअर्स किंवा शेअर्स खरेदी करण्याचा पर्याय मिळत असेल, तर अनेक कर्मचाऱ्यांना ही मोठी आर्थिक संधी वाटते. विशेषतः स्टार्टअप कंपन्यांमध्ये ESOP च्या माध्यमातून भविष्यात लाखो रुपयांची संपत्ती निर्माण होण्याची शक्यता दाखवली जाते. मात्र, कंपनीने दिलेले शेअर्स म्हणजे लगेच हातात आलेले पैसे नव्हेत. त्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात, पैसे गुंतवावे लागू शकतात आणि करही भरावा लागू शकतो. त्यामुळे ESOP स्वीकारण्यापूर्वी त्याची संपूर्ण प्रक्रिया आणि जोखीम समजून घेणे महत्त्वाचे आहे.
काय आहे ESOP? कंपनी कर्मचाऱ्यांना शेअर्स का देते?
ESOP म्हणजे Employee Stock Option Plan. या योजनेअंतर्गत कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना ठरावीक किंमतीला भविष्यात कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा अधिकार देते. हा पर्याय मिळाला म्हणजे कर्मचाऱ्याला शेअर्स मोफत मिळाले, असा त्याचा अर्थ होत नाही.
कंपन्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ नोकरीत टिकवून ठेवण्यासाठी, त्यांच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कंपनीच्या वाढीमध्ये त्यांचा आर्थिक सहभाग निर्माण करण्यासाठी ESOP देतात. विशेषतः स्टार्टअप कंपन्या रोख पगाराव्यतिरिक्त अतिरिक्त लाभ म्हणून या योजनेचा वापर करतात.
मात्र, ESOP आणि प्रत्यक्ष शेअर्स यांमध्ये फरक आहे. पर्याय मिळणे, तो वापरण्यास पात्र होणे आणि पैसे भरून शेअर्स मिळवणे या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत.
