Crime News : उत्तर बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील धूपगुडी परिसरात अनैतिक संबंधातून एक धक्कादायक हत्या घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच तिची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणात 32 वर्षीय सोमा रॉय बर्मन यांचा मृत्यू झाला असून, तिचा पती श्रीकांत रॉय याने गुन्ह्याची कबुली देत स्वतःहून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत रॉय हा मजुरीसाठी केरळमध्ये वास्तव्यास होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी तो परराज्यात कष्टाची कामे करत होता. दीर्घ कालावधीनंतर तो आपल्या गावी धूपगुडी येथे परतला होता. घरी आल्यानंतर पत्नी आणि कुटुंबासोबत शांततेत काही दिवस घालवण्याची त्याची अपेक्षा होती. मात्र, घरी परतल्यानंतर परिस्थिती वेगळीच असल्याचे त्याच्या लक्षात आले.
शेजारच्या लोकांकडून ऐकू येणाऱ्या चर्चा, पत्नीच्या वागण्यात झालेला बदल आणि काही संशयास्पद बाबींमुळे श्रीकांतच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. चौकशीनंतर पत्नी सोमा रॉय बर्मन हिचे शेजारी राहणाऱ्या एका युवकासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे घरात सतत वादविवाद होऊ लागले. या वादातूनच सुमारे आठवडाभरापूर्वी श्रीकांतने संतापाच्या भरात पत्नीला तिच्या कथित प्रियकराच्या घरी पाठवले होते.
मात्र, या निर्णयाने वाद संपण्याऐवजी परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. शनिवारी सकाळी श्रीकांत थेट पत्नीच्या प्रियकराच्या घरी पोहोचला. तेथे सोमा दिसताच त्याचा संताप अनावर झाला. कोणतीही चर्चा न करता त्याने धारदार शस्त्राने सोमा रॉय बर्मन हिच्यावर हल्ला केला. हल्ला इतका गंभीर होता की, सोमा यांना बचावाची संधीही मिळाली नाही आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
घटना घडवून आणल्यानंतर श्रीकांत घटनास्थळावरून पळून न जाता, रक्ताने माखलेले कपडे आणि हत्येसाठी वापरलेले शस्त्र घेऊन थेट धूपगुडी पोलीस ठाण्यात गेला. तेथे त्याने पोलिसांसमोर संपूर्ण घटनेची माहिती देत गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने स्वतःहून आत्मसमर्पण केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी धूपगुडी पोलीस ठाण्यात हत्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











