Crime News : पोलीस कॉन्स्टेबलने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत एका तरुणीने आत्महत्या केलीये.. प्रेमाच्या नावाखाली झालेल्या या फसवणुकीमुळे खचलेल्या तरुणीने अखेर टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठली असून, कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. उत्तर प्रदेशातील आग्र्या शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु मृत्यूला कवेत घेण्यापूर्वी तिने समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला, ज्याने संपूर्ण पोलीस दल हादरून गेले आहे.
ADVERTISEMENT
पोलीस कॉन्स्टेबलकडून चार वर्ष लैंगिक शोषण
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आग्र्यात तैनात असलेला पोलीस कॉन्स्टेबल जेबी गौतम याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. जेबी गौतम हा ताजगंज पोलीस ठाण्यातच कार्यरत होता. पीडितेने मृत्यूपूर्वी चित्रीत केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, आरोपीने तिला पत्नीप्रमाणे चार वर्षे सोबत ठेवले होते. जेव्हा तिने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्याने कुटुंबाचे कारण पुढे करून नकार देण्यास सुरुवात केली. आरोपी तिला केवळ लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंधांसाठी वापरत होता आणि नंतर तिच्यापासून दुरावू लागला. व्हिडिओमध्ये ती आर्त स्वरात विचारताना दिसते की, "तो स्वतः पोलीसवाला आहे म्हणून त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही का?" या एका वाक्यातून तिने व्यवस्थेबद्दल असलेला अविश्वास आणि तिला सहन करावा लागलेला मानसिक त्रास स्पष्टपणे जगासमोर मांडला आहे.
हेही वाचा : लक्झरी कारमधून भीक मागण्यासाठी यायचा, शिफ्टमध्ये काम अन् लाखो रुपयांची कमाई, दुबईतील भिकाऱ्याला अटक
मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ आणि न्यायासाठी केलेली आर्त हाक
तरुणीने आपल्या व्हिडिओमध्ये केवळ जेबी गौतमवरच नव्हे, तर त्याच्या कुटुंबावरही गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, आरोपीचा भाऊ देखील अशाच प्रकारे एका मुलीची फसवणूक करत आहे. "मी जिवंत असताना मला न्याय मिळाला नाही, पण मेल्यावर तरी मला न्याय मिळावा," असे म्हणत तिने आपल्या मृत्यूला जेबी गौतम आणि त्याचे कुटुंब जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय आणि लोकांमध्ये संताप निर्माण झाला. पोलीस कर्मचाऱ्यानेच एका महिलेचा विश्वासघात करून तिला आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत नेल्याने आग्र्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांना या प्रकरणाची तातडीने दखल घेणे भाग पडले, अन्यथा हे प्रकरण नेहमीप्रमाणे दडपले जाण्याची भीती पीडितेने व्यक्त केली होती.
आरोपी कॉन्स्टेबलला अटक आणि कारवाई
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि पीडित कुटुंबाने तक्रार दिल्यानंतर पोलीस विभागात वेगाने हालचाली झाल्या. डीसीपी सिटी अली अब्बास यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी कॉन्स्टेबल जेबी गौतम याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चक्रावली आणि आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले, तिथून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पीडितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. पोलीस आता त्या व्हिडिओला महत्त्वाचा पुरावा मानून तांत्रिक तपास करत आहेत. प्रशासनाने आश्वासन दिले आहे की, आरोपी पोलीस दलातील असला तरी त्याला कोणीही पाठीशी घालणार नाही आणि कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाईल. मात्र, या घटनेने पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून एका निष्पाप तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सूड उगवला, महिलेवर बलात्कार करुन हत्या, वाचवण्यासाठी आलेल्या अंध मुलाचा पाण्यात बुडवून जीव घेतला
ADVERTISEMENT











