Crime News : एका मुलाने आपल्याच आईची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. ईदच्या निमित्ताने नवीन कपडे शिवण्यावरून आरोपीचा त्याच्या पत्नीशी वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय आईला रागाच्या भरात मुलाने उचलून फरशीवर आपटले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. दिल्लीच्या सीमापुरी भागातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ठाकरेंच्या आमदाराची संपत्तीच काढली, काढलेल्या कर्जाचा आकडाही सांगितला! नेमकं काय घडलं?
नवीन कपड्यांवरुन वाद
हमीदुन निशा असे मृत महिलेचे नाव असून त्या नवी सीमापुरी भागात आपला मुलगा शेर अली, सून संजीदा आणि नातवंडांसोबत राहत होत्या. शेर अली गाझियाबादमधील लोनी परिसरात शिंपी काम करतो. बुधवारी रात्री त्याच्या पत्नीने ईदसाठी नवीन कपडे शिवून देण्याची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याचे सांगत शेर अलीने नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. वादाचे रुपांतर हाणामारीत होत असल्याचे पाहून हमीदुन या दोघांना शांत करण्यासाठी मध्ये पडल्या.
आईला उचलून आपटले
यावेळी रागाच्या भरात असलेल्या शेर अलीने आपल्या आईचाच अपमान करत तिला तिथून हटण्यास सांगितले. मात्र, आईने त्याचे न ऐकता दोघांना समजावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. यामुळे संतापलेल्या शेर अलीने रागाच्या भरात आपल्या वृद्ध आईला उचलून जोरात फरशीवर आदळले. या हल्ल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या आणि घरात एकच टाहो फुटला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जीटीबी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे ही वाचा : 'मला चार वर्ष बायको बनवून ठेवलं अन्..', पोलीसासोबत चार वर्ष Live-in मध्ये राहणाऱ्या तरुणीने आयुष्य संपवलं
आरोपीचा कबुलीजबाब
घटनेची माहिती मिळताच सीमापुरी पोलीस रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. मृत हमीदुन निशा यांची मुलगी शबनम हिने आपल्या भावाविरुद्ध हत्येचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत शेर अलीला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने रागाच्या भरात आईला जमिनीवर आदळल्याची कबुली दिली आहे. पोस्ट मार्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











