Crime News : बिहारमधील कटिहार जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मित्रांच्या चिडवाचिडवीपासून सुरू झालेलं भांडण पत्नीच्या निर्घृण खुनापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका पतीला आपल्या पत्नीविषयी संशय निर्माण झाला आणि तो संशय इतका वाढत गेला की त्याने रागाच्या भरात सासरवाडीत जाऊन स्वतःच्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT
“तू एवढा काळा, मग तुझा मुलगा इतका गोरा कसा काय?”
जलकी (आझमनगर) गावातील सुकुमार दास आणि पत्नी मौसमी दास यांना काही महिन्यांपूर्वी दुसरे अपत्य झाले. पहिला मुलगा वडिलांच्या वर्णाचा काळा-सावळा होता, परंतु नुकताच जन्मलेला दुसरा मुलगा गोरा असल्याने सुकुमारच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. त्यातच त्याच्या मित्रांनी, ओळखीच्या लोकांनी सतत टोमणे मारणे सुरू केले. “तू एवढा काळा, मग तुझा मुलगा इतका गोरा कसा काय?” अशा टिप्पणींनी त्याच्या मनातील शंका आणखी बळावली.
घरातील छोट्यामोठ्या भांडणांचे रूपांतर काही दिवसांत मोठ्या वादात झाले. सुकुमार पत्नीला सतत मुलाच्या पित्याबद्दल चौकशी करू लागला. मौसमीने त्याला वारंवार सांगितले की मुलगा त्याचाच आहे, मात्र सुकुमारचे संशयाचे ढग काही हटत नव्हते. अखेर या सततच्या त्रासामुळे मौसमीने वडिलांना बोलावले आणि ती माहेरी माघारी निघून गेली.
पत्नीला वार करुन संपवलं
तीन महिन्यांहून अधिक काळ दोघांमध्ये तणाव कायम होता. सासऱ्यानेही जावयाला समजावण्याचा, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुकुमारच्या मनातील संशय आणखी गडद होत गेला. या तणावाच्या वातावरणात एके रात्री सगळे जण जेवण करून झोपले. मात्र उशिरा सुकुमारने पत्नीला समजावण्याऐवजी अतिउत्साह, राग आणि चुकीच्या संशयाच्या भरात भीषण पाऊल उचलले.
पहाटे मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून घरातील मंडळी धावत खोलीकडे गेली. दरवाजा उघडा होता. आत पाऊल टाकताच त्यांना थरकाप बसला. मौसमी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या गळ्यावर वार केले असल्याचे दिसत होते. इतक्या क्रूरतेने आपल्या पत्नीचा जीव घेतलेल्या सुकुमारचा तेव्हा पर्यंत पत्ता लागला नव्हता. मुलगा मात्र खोलीत रडत बसलेला होता.
घटनेची माहिती मिळताच अबादपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आला आणि मौसमीच्या कुटुंबीयांची जबाब नोंदवण्यात आली. आरोपी सुकुमार दास फरार असून पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. गावात या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बार्शी : गरोदर महिलेला पोलिसांकडून शरीर काळं-निळं पडेपर्यंत मारहाण, मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल
ADVERTISEMENT











