Crime News: एका महिलेने पैशांसाठी आपल्याच मुलाच्या अपहरणाचा बनवा रचल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरण हे उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील असून पोलिसांनी स्वत:च्या मुलाच्या अपहरणाचा बनाव रचल्याच्या आरोपाखाली दोन आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. तसेच, पीडित मुलाला नोएडा येथून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं.
ADVERTISEMENT
मुलाचं अपहरण केल्याची खोटी तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाबथुआ गावातील रहिवासी असलेल्या सोनिया नावाच्या महिलेने गुरुवारी आपल्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तक्रार करताना मोहित, रोहित, सतेंद्र उर्फ सहेंद्री आणि सुभाष या चार तरुणांनी तिच्या मुलाचं अपहरण केल्याचं महिलेने सांगितलं. संबंधित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे, गुन्हा दाखल करण्यात आला आणि याचा तपास पोलिसांनी सुरू केला.
महिलेच्या फोनमध्ये संशयास्पद पुरावे
तपासादरम्यान, पोलिसांना बरेच संशयास्पद पुरावे सापडले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनियाच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे हे घटनेपूर्वीच बंद करण्यात आले होते. तसेच, सोनियाच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद फोन नंबरवरून सतत संपर्क केला जात असल्याचे पुरावे मिळाले. या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांनी सांगितलं की, मुलगा घटनेच्या वेळी त्याच्या गावात नसून तो नोएडामध्ये असल्याचं फोन सर्व्हिलांसवरून कळालं. याच आधारे, मुलाला नोएडा येथून सुखरूपपणे ताब्यात घेण्यात आलं.
हे ही वाचा: चालताना धक्का लागल्याने वाद पेटला! रॉडने बेदम मारहाण करत मुंबईतील रिटायर्ड रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या...
शेजारी राहणाऱ्या तरुणावर लग्नासाठी दबाव
मिळालेल्या माहितीनुसार, सोनियाचा तिच्या पहिल्या पतीसोबत मोठा वाद झाल्याने ती 10-11 वर्षांपासून गाझियाबादमध्ये राहत होती. तसेच, ती तिच्या मुलांना मेरठच्या दबथुवा येथे तिच्या माहेरी सोडून गेली होती. ती जवळपास तीन वर्षांपूर्वी तिच्या गावात परतली होती. दरम्यान, ती तिच्या शेजारी राहणाऱ्या मोहित नावाच्या तरुणावर लग्न करण्यासाठी दबाव आणू लागली. मोहितने लग्नासाठी नकार दिल्यानंतर महिलेने त्याच्याकडून एक लाख रुपये मागितले. मात्र, पैसे देण्यासाठी सुद्धा मोहितने नकार दिला आणि याच रागातून आरोपी महिलेने त्याच्याविरुद्ध 31 ऑक्टोबर रोजी पोलिसात गुन्हा दाखल केला. पैसे मिळाल्यानंतर महिलेने न्यायालयात तिचा जबाब बदलला.
हे ही वाचा: डॉक्टरांनी औषधं दिली, महिलेने पाकीट उघडताच कॅप्सुलमधून अळ्या बाहेर, कल्याणमधील धक्कादायक प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित आणि त्याच्या कुटुंबियांनी तिला अधिक पैसे देण्यास नकार दिल्यावर, सोनियाने तिच्या ओळखीच्या संजय नावाच्या तरुणासोबत मिळून आपल्या 10 वर्षांच्या मुलाला नोएडाला पाठवलं आणि चार तरुणांवर अपहरणाचा खोटा आरोप करून, त्यांच्यावर पैशासाठी दबाव आणण्यासाठी तिने पोलिसात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून सोनिया आणि संजयविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











