Crime News : पती-पत्नीच्या नात्यावर विश्वास, सन्मान आणि सुरक्षिततेची अपेक्षा असते. मात्र उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं असून, एका विवाहित महिलेने स्वतःच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नवऱ्याने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मित्रांमध्ये पसरवलेच नाहीत, तर तिला जबरदस्ती दारू पाजून “तुला विकून टाकीन” अशी धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
करीमुद्दीनपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या या महिलेचं लग्न सुमारे तीन वर्षांपूर्वी झालं होतं. सुरुवातीचे अडीच वर्ष संसारात विशेष वाद नव्हते. मात्र, गेल्या एका महिन्यात पतीच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि त्यानंतर तिचं आयुष्यच अस्थिर झालं, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.
महिलेच्या आरोपानुसार, पतीने तिचे खाजगी आणि आक्षेपार्ह फोटो काढून ते आपल्या मित्रांना पाठवले. एवढ्यावरच न थांबता, तिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला. याची माहिती मिळताच तिने पतीला जाब विचारला. मात्र, उत्तर देण्याऐवजी पतीने तिच्यावर हात उचलला आणि मारहाण केल्याचं पीडितेचं म्हणणं आहे.
तक्रारीनुसार, यानंतर पतीने तिला जबरदस्ती दारू पाजली. दारूच्या नशेत असताना तिला पतीचं संभाषण ऐकू आलं, ज्यात तो कोणाला तरी सांगत होता की, “तिला विकून टाकणार आहे, म्हणूनच हा व्हिडिओ तयार केला आहे.” हे ऐकून ती पूर्णपणे हादरून गेली.
धक्कादायक बाब म्हणजे ही महिला सध्या पाच महिन्यांची गर्भवती आहे. तरीदेखील पतीकडून होणारी मारहाण आणि मानसिक छळ सुरूच होता. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर ती आपल्या बहिणीकडे राहायला गेली. तिथूनच तिने न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली.
महिलेचं म्हणणं आहे की, सुरुवातीला तिने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. अखेर तिने थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सविस्तर तक्रार अर्ज दिला. त्या अर्जात “मला न्याय मिळाला नाही, तर मी टोकाचं पाऊल उचलीन” असा गंभीर इशाराही तिने दिला होता.
पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ करीमुद्दीनपुर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी पतीविरोधात बीएनएस कलम 85, 115 (2) आणि 351 (2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











