Crime News : मुलाने इन्शुरन्सच्या पैसे मिळवण्यासाठी स्वत:च्या आई-बापाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे एका मुलाने विम्याच्या पैशासाठी नातेसंबंधांना काळीमा फासला आहे. मुलाने विम्याचे कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी आपल्या आई-वडिलांना संपवण्यासाठी कटकारस्थान रचलं आणि त्यांचा अपघात झाल्याचं दाखवलंय. दरम्यान, आरोपीच्या पत्नीचाही अपघातात मृत्यू झाला असून त्यातून देखील आरोपीने इन्शुरन्सचे पैसे मिळवले आहेत. सध्या पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याचा साथीदार यांना अटक केली असून तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशातील हापुड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
विशाल सिंघलवर सनसनाटी आरोप
हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी संजय कुमार यांनी हापुड नगर कोतवालीमध्ये आरोपी विशाल सिंघलविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. संजय कुमार यांनी सांगितले की, मृतक मुकेश सिंघल यांच्या नावावर अनेक विमा पॉलिसी होत्या. त्यांचं वार्षिक उत्पन्न 12 ते 15 लाख रुपये होतं. त्यांच्या पॉलिसींमधून एकूण मिळणारा विमा सुमारे 39 कोटी रुपयांचा आहे.
संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पॉलिसीमध्ये मुलगा विशाल कुमारने विमा दावा केला होता. त्यात नमूद केले होते की 27 मार्च 2024 रोजी गढ गंगा येथून परतताना मुकेश सिंघल यांचा अपघात झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, मेरठच्या नवजीवन रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार अपघात रात्री झाला होता आणि त्यानंतर आनंद रुग्णालयात त्यांचा मृत्यू दाखवला गेला होता. संजय कुमार म्हणाले की, मृतकाच्या मुलाने अपघाताचे कारण सांगितले असले तरी पोस्टमॉर्टम अहवालातील जखमा आणि मुलाने सांगितलेल्या जखमा यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे हे सर्व प्रकरण हत्या आणि फसवणुकीचे असल्याचा संशय आहे.
विशाल सिंघल याने तपासादरम्यान विमा कंपनीच्या टीमला सहकार्य केले नाही आणि महत्त्वाचे कागदपत्र दिले नाहीत. एवढेच नाही तर कंपनीच्या एका अधिकाऱ्याला काम लवकर पूर्ण करण्यासाठी लाच देण्याचाही प्रयत्न केला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब घेतले असता हेही समोर आले की त्यांनाही लाच देण्यात आली होती.
आईच्या मृत्यूतही कटकारस्थानाचा संशय
हापुड पोलिसांच्या माहितीनुसार, 21 जून 2017 रोजी विशालची आई प्रभा देवी हिचा पिलखुवा येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. प्रभा देवी त्या वेळी विशालसोबत बाईकवर होत्या आणि त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे दाखवून सरस्वती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रभा देवीच्या मृत्यूनंतर विशालला विमा कंपन्यांकडून सुमारे 80 लाख रुपये मिळाले होते. आता विमा कंपनीने या प्रकरणालाही कटकारस्थान मानले आहे. इतकेच नव्हे तर विशालच्या पत्नीचाही मृत्यू झाला असून त्यासाठी त्याला 30 लाख रुपये विमा मिळाला आहे. हापुडचे सीओ सिटी वरुण मिश्रा यांनी सांगितले की, आरोपांच्या आधारे तपास करताना मेरठच्या गंगानगरचा रहिवासी विशाल सिंघल आणि त्याचा मोहनपुरीतील मित्र सतीश कुमार यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.
ADVERTISEMENT
